मुंबई : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प अर्थात 'सुभेदार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता पुन्हा एकदा दिग्पाल नवा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत. दिग्पाल मोठ्या पडद्यावर मराठवाडा मुक्तिसंग्रामाथी कथा मांडणार असून या नाट्य माहितीपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानी याची निर्मिती केली आहे.
'मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा माहितीपट एक डॉक्यु ड्रामा प्रकार आहे. उपलब्ध कागदपत्रे आणि नाट्यरूपांतर यांची योग्य पद्धतीने सांगड घालून हा माहितीपट तयार केला जाणार आहे. मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची या माहितीपटात अभिनेता अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री पूजा पुरंदरे हे मराठी कलाकार प्रमुख भुमिका साकारत आहेत.