अपात्रता याचिका निकाली काढण्यासाठी कालमर्यादा ठरवा

सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश

    18-Sep-2023
Total Views |

Supreme Court


नवी दिल्ली :
शिवसेना आमदारांच्या प्रलंबित अपात्रतेच्या याचिका एका आठवड्यात निकाली काढण्यासाठी प्रक्रियात्मक निर्देश आणि कालमर्यादा जारी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. याप्रकरणी-पुढील सुनावणी दोन आठवड्यांनतर होणार आहे.
 
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेविषयक कारवाईविषयी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडिवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मे महिन्यापासून प्रलंबित असलेल्या या संदर्भातील कार्यवाही अनिश्चित काळासाठी चालू शकत नसल्याची टिप्पणी केली.
 
यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कारवाई करण्याचे निर्देश देतानाच झालेल्या विलंबाविषयी ताशेरेही ओढले. न्यायालयाने म्हटले की, न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी वाजवी कालावधीत कार्यवाही निश्चित करणे आवश्यक आहे. घटनात्मक शक्ती वापरून जारी केलेल्या निर्देशांचा आदर होईल, अशी न्यायालयास अपेक्षा आहे.
 
त्यामुळे हे प्रकरण निकाली काढण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील एका आठवड्यात कालमर्यादा जारी करण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यवाही निकाली काढण्यासाठी कोणती कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, याची माहिती सॉलिसीटर जनरल तुषार मेहता हे न्यायालयास देतील, असेही न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
 
निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर सुनावणी नाही
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्याविरोधात उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, सोमवारी याप्रकरणी सुनावणी झाली नसून आता तीन आठवड्यांनतर सुनावणी होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.