अन्यथा भावनाउद्रेक होऊन धनगर आंदोलन उभारू शकते

आ. गोपीचंद पडळकर यांचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा

    18-Sep-2023
Total Views |

gopichand padalkar


मुंबई : ''आम्ही सर्व धनगर बांधव आमचे प्रश्न कायदा व संसदीयमार्गाने मार्गी लावण्यास प्रयत्नशील आहोत. परंतु होणारी दिरंगाई व सतत अवहेलना यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. सरकारने याबाबत काळजी व दक्षता घेऊन धनगर त्वरित बैठक आयोजित करावी. अन्यथा महाराष्ट्रात सुद्धा जाठ आंदोलनासारखे धनगर आंदोलन' उभा राहू शकते,'' असा सूचक इशारा धनगर समाजाचे नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आ. पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाच्या प्रश्नांवर एक पत्र लिहून समाजाच्या अडचणींचा पाढाच वाचला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सुरु झालेल्या लढाईत आता धनगर समाजानेही उडी घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर आता धनगर समाजासह ओबीसींनी आरक्षण व इतर प्रश्न पुढे करत आंदोलनाचे हत्यार उपसले असून सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांनी ओबीसी आंदोलनाकर्त्यांची भेट घेत आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नसल्याचे आश्वासित केले आहे. दरम्यान, आ. गोपीचंद पडळकर यांनी लिहिलेल्या पत्रामुळे आता नविन आंदोलन उभा राहणार का असा सवाल निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या. गोपीचंद पडळकर म्हणाले की, '' धनगर आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात सुरू असलेली याचिका व आपल्या महायुती सरकारने समाजासाठी केलेल्या योजनांसंदर्भात काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती आहे. धनगर आरक्षणासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची ऍड कुंभकोणी यांची कायमची नियुक्ती करून सुनावणी करता तात्काळ सरकारतर्फे अर्ज दाखल करण्यात यावा. समाजासाठी सहकार महामंडळाची घोषणा करून त्या संबंधीची योजना कार्यान्वित करण्यासाठी अध्यक्षांची नेमणूक करावी. समाजासाठी घोषित २२ योजनांपैकी प्रभावीपणे राबवल्या न गेलेल्या योजनांचा आढावा घेत त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात,'' अशी विनंती पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तसेच ''मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची आवश्यकता, आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासासाठी २०० कोटींच्या निधीची तरतूद करणे, महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफेगांव येथील किल्ला ताब्यात घेऊन त्याचा विकास आराखडा तयार करण्यात यावा. तथा अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी प्रयत्न करून तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत,'' अशा प्रमुख ६ मागण्या आ. गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे केल्या आहेत. धनगर समाज कायदा व संसदीयमार्गाने प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून यात दिरंगाई झाल्यास महाराष्ट्रात सुद्धा जाठ आंदोलनासारखे धनगर आंदोलन' उभा राहू शकते, असा इशारा पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.