नवी दिल्ली : सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संसदेच्या जुन्या इमारतीतच पार पडणार आहे. त्यानंतर मंगळवारी गणेशोत्सवाच्या शुभमुहुर्तावर संसदेच्या नवीन इमारतीत अधिवेशनाचे पुढील कामकाज पार पडेल.
दरम्यान, आज जुन्या संसद भवनात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आपण नवीन इमारतीत जात असलो तरी जुनी वास्तू पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तसेच जुन्या वास्तूच्या बांधकामाबाबत ते म्हणाले की, ती वास्तू बांधण्याचा निर्णय परकीयांचा होता, पण ती बांधण्यासाठी केलेले कष्ट, घाम आणि पैसा हा भारतीय जनतेचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, संपूर्ण जग भारताला आपला मित्र बनवू इच्छित आहे. जुन्या संसद भवनातून बाहेर पडण्याचा क्षण अतिशय भावनिक असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्हाला येथे अनेक आंबट-गोड अनुभव आले आहेत.
यावेळी २०१४ साली संसदेत प्रवेश केला तो क्षणही पंतप्रधानांना आठवला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, चहा विकणारा मुलगा संसदेत पोहोचला ही देशातील सामान्य माणसाची लोकशाहीला आदरांजली आहे. पंतप्रधान म्हणाले की, काळानुसार संसदेची रचना बदलली आहे आणि आज त्यात समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा समावेश आहे आणि पूर्णपणे सर्वसमावेशक वातावरण आहे.
स्वातंत्र्यानंतर भारताबद्दल व्यक्त करण्यात आलेल्या शंकांना चुकीचे सिद्ध करण्याचे काम या संसद भवनाने केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या संसद भवनात राज्यघटनेच्या निर्मितीचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी संसदेच्या कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. २००१ मध्ये संसद भवनावर झालेला दहशतवादी हल्ला हा लोकशाही आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या हल्ल्यात बलिदान दिलेल्या जवानांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.