नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन दि. १८ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचे सांगत मोठे संकेत दिले.
संसदेच्या विशेष अधिवेशनावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, “संसदेचे हे अधिवेशन छोटे आहे, पण काळाच्या दृष्टीने हे खूप मोठे आहे, हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. या सत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंतचा ७५ वर्षांचा प्रवासाचा नव्याने आरंभ होत आहे.
यावेळी त्यांनी चांद्रयान-३ च्या यशाबद्दलही सांगितले. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा अशा मोहिमा यशस्वी होतात, तेव्हा अनेक शक्यता उघडतात. या काळात पंतप्रधानांसोबत पीएमओ मंत्री जितेंद्र सिंह आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी देखील होते.
G20 चे यश अभूतपूर्व असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी या कार्यक्रमाचे वर्णन संघराज्य रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आणि विविधतेचा उत्सव म्हणून केले. G20 मधील घोषणेची एकमताने तयारी हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे लक्षण असल्याचे त्यांनी वर्णन केले.
२०४७ पर्यंत देश विकसित करण्याच्या आपल्या संकल्पाचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “सर्व खासदारांनी जास्तीत जास्त वेळ मिळावा आणि जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात भेटावे. आयुष्यात असे काही क्षण असतात जे आपल्याला उत्साह आणि विश्वासाने भरून टाकतात. मला आशा आहे की तुम्ही जुन्या वाईट गोष्टींना मागे टाकून चांगल्या गोष्टी घेऊन नवीन संसद भवनात प्रवेश कराल.”
गणेश चतुर्थीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, भगवान गणेश हे विघ्न दूर करणारे मानले जातात. त्यामुळे भारताच्या विकासाच्या प्रवासात कोणतेही अडथळे येणार नाहीत. गणेश चतुर्थीच्या दिवशी निघालेल्या या प्रस्थानामुळे नव्या भारताची सर्व स्वप्ने साकार होतील. उल्लेखनीय आहे की नवीन संसद भवनातील कामकाज १९ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीपासून सुरू होणार आहे.