मुंबईसह देशातील ६ शहरात सीबीआयचा छापा!

    18-Sep-2023
Total Views |
Mumbai Nagpur CBI Raids

मुंबई
: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई आणि नागपूरसह देशातील सहा मोठ्या शहरांमध्ये शाळेच्या निविदांमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी छापे टाकले. निविदेसाठी (लाचखोरी प्रकरण) मोठी लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या छाप्यात खासगी कंपनीच्या मालकासह सात जणांना अटक करण्यात आली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ब्रिज अँड रूफ कंपनी (इंडिया) लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चे कार्यकारी सचिव आशिष राजदान यांच्यासह एका खाजगी कंपनीचे मालक आहेत. अन्य आरोपींमध्ये एच.पी. राज्यगुरू (राजकोट) कंपनीच्या मालकांमध्ये हेतलकुमार प्रवीणचंद्र राज्यगुरू, शशानकुमार जैन (कोलकाता), सोमेश चंद्र (नोएडा), वीर ठक्कर (मुंबई), राजीव रंजन (दिल्ली), तरंग अग्रवाल (दिल्ली) यांचा समावेश आहे.

सीबीआय (नागपूर) नुसार, ओडिशातील एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या (ईएमआरएस) कामासाठी निविदा काढण्यात आली होती. अटक केलेल्या सात आरोपींनी शाळेच्या कामाची निविदा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. आशिष राजदान याने निविदा काढण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाचेची रक्कम हवालामार्फत देण्यात येणार होती. सीबीआयला याची माहिती मिळताच नागपूर, मुंबई, दिल्ली, नोएडा, कोलकाता आणि राजकोट शहरातील आरोपींच्या घरांवर छापे टाकण्यात आले.

सीबीआयने छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि २६.६० लाख रुपये जप्त केले आहेत. नागपूरच्या नरेंद्र नगर येथील एका शिक्षकाच्या घरी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सीबीआयचा छापा सुरू होता. शाळेच्या टेंडरसाठी १९.९६ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवरही आरोप आहे. लाचेची रक्कम आणि काही कागदपत्रे नागपुरातील एका शिक्षकाच्या घरी असल्याची माहिती दिल्ली सीबीआयला मिळाली होती. सीबीआयने आरोपीच्या घरातून काही कागदपत्रे, मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.