भारत हा जागतिक शांतता आणि संयमाचा आवाज – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

    18-Sep-2023
Total Views |

Om Birla


नवी दिल्ली :
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी२० शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'दूरदर्शी' नेतृत्वाची प्रशंसा केली. ओम बिर्ला म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या 'दूरदृष्टी आणि मार्गदर्शनामुळे' जी२० नेत्यांनी जारी केलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यात संवेदनशील मुद्द्यांवर एकमत झाले.
 
ते पुढे म्हणाले की, भारताच्या जी२० अध्यक्षतेखाली देशभरातील ६० शहरांमध्ये २०० बैठका झाल्या. जी२० शिखर परिषदेदरम्यान भारत हा जगात शांतता आणि संयमाचा आवाज म्हणून उदयास आला आहे. पुढील महिन्यात संसदेद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या पार्लमेंट २० शिखर परिषदेत संपूर्ण जगाचे स्वागत करावे आणि 'वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हे ध्येय पुढे नेण्यात भागीदार व्हावे, असे आवाहनही अध्यक्षांनी केले.
 
भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनीदेखील राज्यसभेत दिल्लीत जी२० नेत्यांची शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल देशाचे अभिनंदन केले. शिखर परिषदेच्या निकालांचे ‘परिवर्तनात्मक’ म्हणून कौतुक करून, हे परिणाम येत्या दशकांमध्ये जागतिक व्यवस्थेला आकार देण्यास मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
निकोप चर्चा ही बहरलेल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे असे सांगून धनखड यांनी संघर्षात्मक पवित्रा तसेच व्यत्यय आणि अडथळा आणण्याला शस्त्र बनवू नये यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले. आपण सर्वजण लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी घटनात्मकदृष्ट्या नियुक्त आहोत आणि त्यामुळे लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांचा विश्वास सार्थ करणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.