नवी दिल्ली : सोमवारपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन पाच दिवस चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संसदेच्या जुन्या इमारतीत चालणार आहे. दुसऱ्या दिवसापासून गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर संसदेच्या नव्या इमारतीत हे अधिवेशन पार पडणार आहे.
संसदेच्या या नवीन वास्तूचे बांधकाम विशेष पद्धतीने करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय स्थापत्य आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. संसदेत प्रवेश करण्यासाठी सहा दरवाजे तयार करण्यात आले आहेत. यातील पहिल्या तीन दरवाज्यावर हत्ती, घोडा आणि गरुडाची मुर्ती उभारण्यात आली आहे.
या तीन दरवाज्यांना हिंदीत विशेष नावही देण्यात आले आहे. ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी या दरवाज्यांना नावे देण्यात आली आहेत. उपराष्ट्रपती, सभापती आणि पंतप्रधान हे या तीन दरवाज्यांमधून प्रवेश करतील. येथील प्रत्येक दारावर प्राण्यांच्या मूर्तींचे सांस्कृतिक महत्त्व दर्शविणारी एक स्क्रिप्ट लावण्यात आली असून यातून प्राण्यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या तिन्ही दरवाज्यांवर बसवण्यात आलेल्या प्राण्यांच्या मुर्त्यांचे विशेष महत्त्व आहे.
गजद्वार
नव्या संसद भवनाच्या उत्तर दिशेला असलेल्या गज गेटवर लाल दगडापासून तयार करण्यात आलेल्या हत्तीच्या दोन मुर्त्या आहेत. या मुर्त्या म्हणजे बुद्धिमत्ता, संपत्ती, स्मरणशक्ती आणि बौद्धिकतेचे प्रतीक असल्याचे सांगण्यात येते. उत्तर दिशा ही बुध ग्रहाशी संबंधित असून ते बुद्धिमत्तेचे प्रतिक आहे. त्यामुळे या दरवाजावर हत्तीची मुर्ती बसवण्यात आली आहे.
घोडाद्वार
संसद भवनाच्या दक्षिणेकडील दरवाजावर घोड्याची मुर्ती बसवण्यात आली आहे. याला शक्ती, सामर्थ्य आणि गतीचे प्रतीक मानले जाते. तसेच ते उत्तम प्रशासनाचे प्रतीक असल्याचेही सांगण्यात येते.
गरुडद्वार
येथील पुर्वेकडील प्रवेशद्वारावर गरुडाची मूर्ती उभारण्यात आली आहे. पुर्व दिशा ही सूर्याशी संबंधित असून ती आशा, विजय आणि यश दर्शवते.
मकरद्वार
येथील एका प्रवेशद्वारावर मकराची मूर्ती बसवण्यात आली आहे. मकर हा एक जलचर प्राणी असून तो विविध प्राण्यांच्या शरीराचे अवयव एकत्रित करतो. त्यामुळे विविधतेत एकता या भारतीय संस्कृतीचे तो प्रतिनिधित्व करतो.
शार्दुलद्वार
नव्या संसद भवनामध्ये एक शार्दूल गेटसुद्धा आहे. शार्दूल हा सर्वात शक्तिशाली आणि सतत विकसित होणारा प्राणी मानला जातो. देशातील जनतेच्या शक्तीचे प्रतिक म्हणून या प्राण्याची मुर्ती तयार करण्यात आली आहे.
राजहंस द्वार
राजहंस गेटवर राजहंसाची मूर्ती आहे. राजहंस प्राण्याला शहाणपण आणि आत्म-ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. अनेक वाईट गोष्टींमधून चांगल्या गोष्टीची निवड करण्याऱ्या राजहंसालाही नवीन संसद भवनात स्थान देण्यात आले आहे. मकर, हंस आणि शार्दुल या दरवाजांचा वापर खासदार आणि जनतेसाठी केला जाणार आहे.