‘आयुष्मान भव’द्वारे विस्तारणार ‘आयुष्मान भारत’चे यश

    18-Sep-2023
Total Views |
Article On Union Ministry of Health Ayushman Bharat

‘आयुष्मान भव’ या योजनेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. १३ सप्टेंबर रोजी शुभारंभ केला. तसेच ‘आयुष्मान आपल्या दारी’ हा उपक्रम दि. १७ सप्टेंबर रोजी एका व्यापक देशव्यापी मोहिमेच्या रुपात सुरू झाला आहे आणि तो दि. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानिमित्ताने ‘आयुष्मान भारत’ योजनेचे व्यापक यश अधोरेखित करणारा हा लेख....

सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीच्या महत्त्वाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७च्या ’राष्ट्रीय आरोग्य धोरणा’नुसार २०१८ मध्ये ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रम सुरू केला. ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत देशाच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या लोकांपर्यंत, मग ते कोणत्याही भागात राहणारे असोत किंवा त्यांचा आर्थिक स्तर कोणताही असो, त्यांच्यापर्यंत व्यापक आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. लहान लहान भागांमध्ये विभागलेल्या आरोग्य सेवेऐवजी ‘आयुष्मान भारत’ने सर्वांगीण, आरोग्यविषयक गरजांवर आधारित दृष्टिकोन स्वीकारला आहे. याअंतर्गत प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावर आरोग्य आणि निरामयता केंद्रे (HWCS)आणि ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’च्या(PMAJ­Y) माध्यमातून रोगप्रतिबंध, निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन आणि आरोग्याची काळजी घेणे. ही उद्दिष्टे साध्य करण्यात येत आहेत.

पण, आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या निर्मितीपुरते हे सर्व मर्यादित नाही, तर भारतामधील प्रत्येकाला त्याचा लाभ मिळेल, हे सुनिश्चित करणे हेदेखील उद्दिष्ट आहे. म्हणूनच ‘पंतप्रधान जनआरोग्य योजने’बाबत जागरूकता निर्माण करण्यासह एकाही व्यक्तीला वंचित न ठेवता, सर्वांपर्यंत योजनेचे लाभ पोहोचवण्यावर भर देणे, आयुष्मान भारत आरोग्य खाते ओळखपत्र तयार करणे आणि आपल्या गावातच त्याबरोबरच शहरी प्रभागांमध्ये रोगनिदान करण्यासाठीच्या तपासणी प्रक्रिया आणि क्षयरोग, उच्च रक्तदाब, सिकल सेल, मधुमेह इत्यादींसारख्या विविध आजारांचे व्यवस्थापन यांसारख्या विविध आरोग्य सेवा पुरवणे आदी उद्दिष्टे असलेल्या ‘आयुष्मान भव’ या योजनेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. १३ सप्टेंबर रोजी शुभारंभ केला.

लोकांना आरोग्य सेवांची माहिती मिळेल आणि त्यांचा ते सहजतेने वापर करू शकतील, हे सुनिश्चित करून देशभरातील ६.४५ लाख गावे आणि २.५५ लाख ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचणे, हे ‘आयुष्मान भव’चे प्राथमिक उद्दिष्ट आहे. सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीचे उद्दिष्ट असलेल्या कोणीही वंचित राहणार नाही, या अंत्योदयाच्या सिद्धांताला अनुसरून यांची रचना करण्यात आली आहे. आरोग्यसेवेपासून एकही व्यक्ती वंचित राहू नये(सॅच्युरेटेड) यासाठी या मोहिमेत, सेवा पंधरवड्यासारख्या उपक्रमांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये अवयवदान मोहीम, स्वच्छता अभियान, रक्तदान उपक्रम आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे.

आरोग्यसेवेपासून एकही व्यक्ती वंचित राहू नये (सॅच्युरेटेड) यासाठी मूलभूत नियोजनप्रक्रिया बळकट करून तीन प्रमुख स्तंभांचा वापर करून ही मोहीम‘आयुष्मान भारत’च्या व्याप्तीमध्ये वाढ करीत आहे. हे तीन प्रमुख स्तंभ आहेत १) आयुष्मान आपल्या दारी ३.० २) आयुष्मान सभा ३) आयुष्मान मेळा. सर्वसमावेशक व्याप्ती, सहकार्यकारक जागरूकता निर्मिती आणि समुदाय केंद्रित प्रयत्न यावर भर देऊन, हे स्तंभ सेवांच्या वितरणात सुधारणा करतील.

‘आयुष्मान आपल्या दारी ३.०’ हा उपक्रम आपल्या आधीच्या आवृत्त्यांच्या (१.० आणि २.०) यशावर आपल्या कार्याची उभारणी करेल, ज्यामध्ये जास्तीत जास्त व्याप्ती सुनिश्चित करून ‘आयुष्मान भारत’ सेवांच्या वाढीव वापरासह ‘आयुष्मान कार्ड’ वितरणाच्या कामात वाढ करण्याचा समावेश आहे. भारतामध्ये उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य सेवा योजना आणि सेवांबाबत जागरूकता निर्माण करण्याला प्रोत्साहन देणे, हा आयुष्मान सभेचा उद्देश आहे. ग्रामीण आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समिती या सभेचे नेतृत्व करेल.

‘आयुष्मान भव’ उपक्रमाला आणखी चालना देण्यासाठी, आयुष्मान मेळा अनेक आरोग्यविषयक समस्यांच्या एका विस्तृत संचाची हाताळणी करणारा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणारा आणि आरोग्यसेवाच्या वापरात वाढीला चालना देणारा एक मंच म्हणून काम करेल.

‘आयुष्मान आपल्या दारी’ हा उपक्रम दि. १७ सप्टेंबर रोजी एका व्यापक देशव्यापी मोहिमेच्या रुपात सुरू झाला आहे आणि तो दि. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. ‘पंतप्रधान जनआरोग्य योजना’ आणि पोषण समिती (VHSNCS) अंतर्गत सुमारे ६० कोटी लाभार्थ्यांना ‘आयुष्मान कार्ड’च्या उच्च तरतुदी हा उपक्रम सुनिश्चित करेल.

‘आयुष्मान आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कुटुंबाला ‘एबी-पीएमजेएवाय योजने’अंतर्गत आरोग्य पत्रिका वितरित केल्या आहेत. हे सुनिश्चित करून ‘आयुष्मान कार्ड’साठी पात्र कुटुंबाची नोंदणी करण्यात येईल. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचे ‘आयुष्मान कार्ड’ मिळेल, परवडण्याजोग्या आरोग्य सेवांपासून कोणीही वंचित राहणार नाही, हे सुनिश्चित करणे, हे या स्तंभाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

‘आयुष्मान सभा’ या उपक्रमाचा प्रारंभ दि. २ ऑक्टोबर रोजी होईल आणि देशभरातील गावे आणि शहरी प्रभागांमध्ये दि. ३१ डिसेंबरपूर्वी त्याची पुढची फेरी होईल. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांची माहिती मिळवण्यासाठी त्याबरोबरच आरोग्य सेवांबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी, आरोग्यसेवा प्रणालींच्या सामाजिक उत्तरदायित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ‘जनभागीदारी से जन कल्याण’ यांचा दाखला देण्यासाठी एक मंच म्हणून काम करेल. या सभांमध्ये ‘पीएमजेएवाय कार्ड’चे वितरण, पॅनेलसूचीबद्ध रुग्णालयांची माहिती प्रदर्शित करणे, ‘आयुष्मान भारत’ आरोग्य खाते ओळखपत्र तयार करणे, निदानासाठी तपासणी सेवा आणि विविध आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्य संवादांचे आयोजन करणे, यांसारख्या कामांचा समावेश असेल. यामध्ये खासदार/आमदार, ‘पीएमजेएवाय‘चे लाभार्थी, ‘आयुष्मान भारत’ आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे लाभार्थी आणि निःक्षय मित्र आणि इतर परोपकारी व्यक्तींचा सहभाग असेल.

देशभरातील गावांमधील १.६ लाख आरोग्य आणि निरामयता केंद्रांमध्ये प्रत्येक आठवड्याला सातत्याने आयुष्मान मेळ्यांचे आयोजन होईल आणि तालुका पातळीवर सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्येही वैद्यकीय महाविद्यालयांकडून त्यांचे आयोजन करण्यात येईल. रोगांपासून सर्वाधिक असुरक्षित आणि गरीब जनतेमध्ये कोणालाही वंचित राहू न देणार्‍या आरोग्यसेवांबाबत जागरूकता निर्माण करण्यामध्ये हा स्तंभ केंद्रीय भूमिका बजावत आहे. या मेळ्यांमध्ये तालुका स्तरावर ईएनटी, नेत्र आणि मानसिक आरोग्य तपासणीच्या विशेष सेवा उपलब्ध करण्याचे नियोजन असून, विशेष प्रकारच्या उपचारांमध्ये वाढ करणे, निगा राखण्याच्या सातत्याला बळकटी देणे, समुदाय आणि आरोग्य प्रणाली यांच्यादरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण करणे, आरोग्याविषयक जागरूक वर्तनात आणि आरोग्य साक्षरतेत सुधारणा करणे, वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच्या संपर्कात वाढ करणे आणि उपचारांची गरज असलेल्या प्रत्येक आजारी व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे, हा याचा उद्देश आहे.
 
प्रत्येक गावाचे आणि शहरी प्रभागाचे रुपांतर तळागाळाच्या स्तरापर्यंत समग्र आणि शाश्वत विकास पोहोचवून ‘आयुष्मान ग्राम पंचायत’ आणि ‘आयुष्मान शहरी प्रभाग’ यामध्ये करणे. ही योजनेची अपेक्षित फलनिष्पत्ती आहे. आयुष्मान कार्डचे वितरण, ‘आयुष्मान भारत’ आरोग्य खाते ओळखपत्र तयार करणे, लोकसंख्येवर आधारित तपासणी, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य (NCD) आणि इतर रोगांची चाचणी आणि उपचार यांसह प्रत्येक स्तंभाखाली निवडलेल्या योजनांचे १०० टक्के व्याप्ती साध्य करणार्‍या गावांना प्रमाणित करणे, हे एकंदर उद्दिष्ट आहे.

आरोग्यसेवा वितरणाबाबतच्या आमच्या सुयोग्य दृष्टिकोनाचा विचार केला, तर एकाही व्यक्तीला वंचित न ठेवणार्‍या आरोग्यसुविधांची व्याप्ती हे केवळ एक लक्ष्य नाही, तर आपल्या बृहद आरण्यक उपनिषदामध्ये उल्लेख केलेल्या ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग् भवेत्।’ (सर्व सुखी होऊ देत, निरोगी बनू दे, सर्वांना सर्वत्र चांगल्या गोष्टी दिसू दे, कोणालाही कधीही कोणतेही दुःख होऊ नये) या श्लोकाला अनुसरून प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या दृष्टिकोनानुसार, मानवतेची सेवा करण्याची एक खंबीर वचनबद्धता आहे. ‘आयुष्मान भव’ हे सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्याच्या याच वचनबद्धतेचे वास्तविक स्वरूप आहे. यामध्ये प्रयत्न आणि दैवी देणगी या दोहोंचाही समावेश आहे. प्रत्येक नागरिक आणि एक संपूर्ण राष्ट्र यांच्यासाठी दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या संभावना वाढवणारे आहे.

डॉ. मनसुख मांडवीय
(लेखक केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आहेत.)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.