‘पुस्तक भिशी’च्या प्रणेत्या

    18-Sep-2023
Total Views |
Article On Rupali Sonawane Vachanvel Pratishthan

रुपाली सोनवणे यांनी ‘वाचनवेल प्रतिष्ठान’च्या माध्यमातून केवळ ४० सदस्यांच्या विश्वासाच्या शिदोरीवर २०१८ मध्ये ‘पुस्तक भिशी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यांच्या या अभिनव उपक्रमाविषयी...

हल्लीची पिढी वाचतच नाही. तरुणाई समाजमाध्यमं आणि ऑनलाईन गेमिंगमध्ये मश्गूल आहे. त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी ओरड सध्या सर्वत्र ऐकायला मिळते. या आव्हानात्मक परिस्थितीतही वाचन संस्कृती रुजवण्यासाठी रुपाली सोनवणे यांनी ‘पुस्तक भिशी योजने’च्या माध्यमातून अनोखी चळवळ सुरू केली. त्यांचा हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे. आपल्या आवडीची पुस्तके तीदेखील ’भिशी योजने’तून आणि सवलतीच्या दरात अगदी घरपोच उपलब्ध होत असल्याने ही वाचनवेल दिवसेंदिवस बहरताना दिसते.

नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि सध्या ‘संताजी उद्योग समूहा’च्या संचालक म्हणून उद्योग क्षेत्रात झोकून काम करणार्‍या रुपाली सोनवणे यांचा विवाह वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी झाला. कौटुंबिक जबाबदार्‍या अंगावर पडूनही त्यांनी शिक्षण घेण्याची जिद्द काही सोडली नाही. त्यांनी बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणाला पाठिंबा मिळेल, असं वातावरण त्यांच्या घरी नव्हतं. परंतु, त्यांनी घरातील सर्व जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडल्यामुळे त्यांना शिक्षणात फारसा विरोध झाला नाही.

रुपाली सोनवणे यांनी पुस्तक वाचण्याच्या छंदातूनच त्यांना ‘पुस्तक भिशी योजना’ ही अभिनव कल्पना सूचली. त्यांनी ‘वाचनवेल प्रतिष्ठान’च्या माध्यमातून केवळ ४० सदस्यांच्या विश्वासाच्या शिदोरीवर २०१८ मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेची एकूण सदस्य संख्या आजघडीला चार हजारांवर पोहोचली आहे. यात दिवसागणिक वाढ होत असून, देशभरातील तब्बल १५ हजारांहून अधिक मराठी वाचक सदस्यांच्या घरी त्यांच्या आवडत्या लेखकांची सुमारे दोन लाख पुस्तके या उपक्रमांतून पोहोच करण्यात आली आहेत. विशेष बाब म्हणजे, पुस्तक मागणीत गेल्या तीन वर्षांत तरुण वाचकांची संख्या सर्वाधिक आहे. ‘पुस्तक भिशी’चा हा उपक्रम राज्यातला पहिलाच उपक्रम ठरलाय, असं रुपाली अभिमानाने सांगतात.

जशी पैशांची भिशी असते आणि आपला नंबर आल्यावर आपल्याला पैसे मिळतात किंवा सराफा व्यापार्‍यांकडे सोन्याची भिशी असते, तिथे हप्ते भरून झाल्यानंतर त्या रकमेचे दागिने घेता येतात, त्याऐवजी ‘पुस्तक भिशी योजने’त पुस्तके मिळतात. आवर्जून पुस्तक विकत घेणं शक्य होत नाही किंवा वाचनालयाचे सदस्य होऊनही संसार-नोकरी व्यवसायाच्या धबडग्यात वाचनात सातत्य राखता येत नाही आणि प्रत्येक वेळी पुस्तक विकत घेऊन वाचन करणं परवडत नाही. वाचनसंस्कृती लोप पावण्यास ही कारणं असल्याचे रुपाली यांनी अचूक हेरले. या बाबींमुळे वाचनापासूून दुरावत चाललेल्यांची वाचनाची भूक भागवण्यासाठी ‘पुस्तक भिशी’ची संकल्पना रुपाली यांच्या डोक्यात आली. त्यांनी सहज फेसबुकवर पोस्ट लिहिली आणि कुणाला पुस्तक भिशी लावायची आहे का? अशी विचारणा केली.

तोपर्यंत रुपाली यांनी काहीच नियोजन केलं नव्हतं. मात्र, काही सदस्यांचे फोन येऊ लागले. सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. सुरुवातीला ४० लोक सहभागी झाले आणि बघता बघता भिशीचा पहिला नंबर काढण्यात आला. सुरुवातीला रुपाली यांनी लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी काढली. त्याचा व्हिडिओ सदस्यांना पाठवला. त्यामुळे सदस्यांचा उपक्रमाबद्दल विश्वास वाढला. ‘वाचनवेल प्रतिष्ठान’ची अधिकृत नोंद असून, ‘वाचनवेल’ नावाचे स्वामित्व अधिकार (कॉपीराईट्स) प्रतिष्ठानकडेच आहेत. ‘पुस्तक भिशी’ उपक्रम कसा चालतो, याविषयी माहिती रुपाली सोनवणे यांनी माहिती दिली. प्रत्येक आठवड्याला सदस्याला १०० रुपये भरावे लागतात. समजा, ग्रुपमध्ये १०० सदस्य असतील, तर दर आठवड्याला दहा सदस्यांचे नंबर काढले जातील. त्या दहा सदस्यांना १ हजार, २०० रुपये किमतीची पुस्तके दिली जातील.

अशा प्रकारे भिशी १२ आठवडे चालते आणि सर्व सदस्यांचा नंबर येतो. सदस्यांच्या आवडीच्या पुस्तकांची यादी मागवली जाते. त्या यादीतील पुस्तकांच्या किमतीप्रमाणे १ हजार, २०० रुपयांची पुस्तके सदस्यांच्या पत्त्यांवर कुरिअरने घरपोच पाठवली जातात. ही सर्व प्रक्रिया व्हॉट्स गु्रपच्या समन्वयातून पूर्ण केली जाते. ‘पुस्तक भिशी’चा नंबर हा ऑनलाईन काढला जातो. ज्या वाचकाचा नंबर लागतो, त्याला मोबाईलवर असलेल्या ग्रुपद्वारे माहिती दिली जाते.

शिवाय, प्रतिष्ठानकडून पुस्तकांची यादीही पाठवली जाते. या यादीतील पुस्तके संबंधित वाचकाला नको असतील, तर आवडत्या पुस्तकांची यादी प्रतिष्ठानच्या ग्रुपवर पोस्ट केल्यानंतर आठ दिवसांत पुस्तके घरी पाठवली जातात.पुस्तकांचं पार्सल मिळाल्याचा अभिप्राय जेव्हा वाचक सांगतात, तेव्हाचा त्यांचा आनंद खूप समाधान देऊन जातात, असं रुपाली आवर्जून सांगतात. ज्यांना कधी स्वतःच्या आवडीची पुस्तके खरेदी करता येतील, असं कधी स्वप्नातही वाटल नव्हतं, त्यांच्याकडे या योजनेच्या माध्यमातून शेकडो पुस्तकं संग्रही आहेत, हेच या योजनेचे फलित.

एकूणच रुपाली सोनवणे यांनी ‘पुस्तक भिशी योजने’च्या माध्यमातून लावलेल्या इवल्याशा रोपट्याची वाचनवेल दिवसागणिक बहरत चालली आहे. या वाचनवेलीच्या माध्यमातून वाचन संस्कृती अधिकाधिक वृद्धिंगत होवो, यातून मराठी वाचकांची नवी पिढी घडो, या कार्यासाठी रुपाली यांनी दै.‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!

अभिषेक कांबळे
(अधिक माहितीसाठी संपर्क- ९५२७८६२९१८)

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.