श्रीगणेशाची प्रतीकात्मकता

    18-Sep-2023
Total Views |
Article On Ganesh Festival Lord Ganesha

हिंदू देवतांमध्ये विघ्नांचा परिहार करणारी आणि अभीष्टदायिनी, यश देणारी गणेश देवता भक्तांना अत्यंत प्रिय आहे. महागणपती, हेरंब, विनायक ही तिची अन्य नावे आहेत. अशा या गणेशदेवतेच्या प्रतीकात्मकतेचा आज गणेश चतुर्थीनिमित्त घेतलेला हा मागोवा...

गणांना त्वा गणपतिं हवामहे
कविं कवीनामुपमश्रवस्तमम्।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत
आ नः श्रृण्वन्नूतिभिः सीद सादनम्॥
(ऋग्वेद २.२३.१, कृष्ण यजुर्वेद, तैत्तिरीय संहिता २.३.१४.३ काठक संहिता १०.१२.४४.)
अर्थात, समुदायाचा प्रभू म्हणून तू गणपती. ज्ञानवानांमध्ये तू अत्यंत ज्ञानी. कीर्तिवंतांमध्ये तू वरिष्ठ. तूच राजाधिराज. तुला आम्ही आदराने पाचारण करतो. तू आपल्या सर्व शक्तींसह ये आणि या आसनावर विराजमान हो.

या मंत्रातील ‘गणपती’ या शब्दाच्या निर्देशामुळे काही विद्वान गणपतीला वैदिक देवता मानतात. ‘ब्रह्मणस्पती’ ही वैदिक देवता असून, तिलाच ‘गणपती’ या नावाने प्रस्तुत सूक्तात संबोधिले आहे आणि पुढील काळात ‘ब्रह्मणस्पती’ ही देवता ‘गणपती’ या नावाने प्रसिद्ध झाली, असे ते मानतात, तर श्रौत यज्ञांमध्ये गणपतीला हविर्द्रव्ये अर्पण केली जात नसत म्हणून ती वैदिक देवता नसावी, असा काही विद्वानांचा तर्क आहे. ‘विनायक’ या ग्रामदेवतेपासून गणेशाची उत्क्रांती झाली असावी, असा सिद्धांत ते मांडतात. मात्र, विनायक ही विघ्न निर्माण करणारी - विघ्नकर्त्री देवता मानली जात असे, तर गणपती ही विघ्नहर्त्री देवता मानली जाते, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. अथर्ववेदातील गणपत्यथर्वशीर्ष उपनिषद गणपतीच्या स्वरुपाचे साद्यन्त विवेचन करते.
हिंदू धर्म समन्वयासाठी प्रसिद्ध आहे. वैदिक देवता विस्मरणात जाऊ नयेत, म्हणून वैदिक आणि पौराणिक देवतांना उपासनेसाठी एकत्र आणणे, हे समन्वयाचे उपयोजन होय.

परिणामी, विष्णू आणि सूर्य या वैदिक देवतांसह शिव, गणेश व दुर्गा यांचा पंचायतनात समावेश करण्यात आला आणि घरोघरी पंचायतनामध्ये या देवतांची नित्यपूजा करण्याची प्रथा रूढ झाली. शिवमंदिराच्या भिंतीवर द्वारपाल म्हणून गणेश देवता विराजमान असते. याशिवाय गणेशाची स्वतंत्र मंदिरे असतातच. त्यापैकी काहींमध्ये स्वयंभू गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आढळते. विद्यारंभी, विवाहविधीला आरंभ करण्यापूर्वी, गृहप्रवेशाच्या प्रसंगी, यात्रेला प्रस्थान करताना, संग्रामाच्या प्रारंभी आणि संकटात गणेशाचे स्मरण केले असताना, विघ्ने निर्माण होत नाहीत. (विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा। संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते॥)
यजमानाच्या इष्टपूर्तीसाठी तसेच त्याला यश मिळावे, त्याचे कार्य निर्विघ्न पार पडावे, या हेतूने गणेशाचे मनोभावे पूजन केले जाते.

गणेशाच्या जन्माविषयी प्रचलित आख्यायिकांची प्रतीकात्मकतागणेशाच्या जन्माविषयी पुराणांमध्ये विविध आख्यायिका आढळतात. गणेशाची निर्मिती शिवाने केली असा निर्देश, त्याचप्रमाणे पार्वतीने रक्षक असावा, या हेतूने शरीरावरील मळापासून त्याची निर्मिती केली असाही उल्लेख आढळतो. (शिवपुराण २.४.१३.२० स्कंद पुराण ६.२१४.४७-५०,३.२.१२.१०-१२) यामधील प्रतीकात्मकता जाणणे आवश्यक आहे. गणेशाची निर्मिती शिवाने केली, असे मानता येते. कारण, शिव सिद्धांत दर्शनानुसार शिव सृष्टीचा निर्माता आहे. पार्वती ही शिवाची प्रकृती म्हणजे माया होय.

मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं च महेश्वरम्। तस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत्॥
असे श्वेताश्वतरोपनिषदात (१०) नमूद केले आहे. महेश्वर मायेचा स्वामी असून, प्रकृती ही त्याची माया आहे. या मायेपासून गणेशाची निर्मिती झाली म्हणजे एकट्या पार्वतीने गणेशाची निर्मिती केली, असेही मानता येते. आता पार्वतीने तिला रक्षक हवा होता म्हणून शरीरावरील मळापासून गणेशाची निर्मिती केली, या प्रतिपादनातील प्रतीकात्मकता जाणून घेऊ. ‘पार्वती’ शब्द ‘पर्वत’ शब्दाचे तद्धित रूप आहे. पर्वतांनी युक्त ती पार्वती अर्थात पृथ्वी. तिच्यात १/२ भाग पृथ्वीतत्त्व आणि प्रत्येकी १/८ भाग आकाश, वायू, तेज, जल ही महाभूते समाविष्ट आहेत. पार्वतीने म्हणजे पृथ्वीने शरीरावरील मळापासून म्हणजे मृत्तिकेपासून, जी तिचे शरीरच आहे, तिच्यापासून गणेशाची निर्मिती केली. यामुळे गणेशाच्या पार्थिव-मृण्मयी मूर्तीला अन्य धातूंच्या किंवा रत्नांच्या मूर्तीपेक्षा अधिक महत्त्व का आहे, हे लक्षात येते.

पृथ्वीपासून चंद्राची उत्पत्ती झाली. चंद्र हा साक्षात गणेश आहे, अशी श्रद्धा आहे. (चन्द्रमास्त्वम्-अथर्वशीर्ष). तो पृथ्वीभोवती भ्रमण करतो. यावरून तो तिचा रक्षक आहे, हे रूपक तयार झाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव मूर्तीची पूजा केली असता, तिच्यावर दृष्टी एकाग्र करावी आणि तिचे जे मूळ रूप चंद्र त्याला बघू नये, असे मत प्रचलित आहे. याचे कारण, पार्थिव मूर्ती साक्षात गणेश असलेल्या चंद्राचे प्रतीक आहे.

प्रतीकोपासनेत प्रतीकाला मूळ वस्तूपेक्षा अधिक महत्त्व असते. यास्तव तो दिवस प्रतीकाच्या साधनेत घालवावा.

गणेशाच्या स्वरुपाची तात्त्विक मीमांसा

गणेशाचा पिता शिव हा गणांचा नायक असल्यामुळे पुत्रालाही गणेश नामाभिधान प्राप्त झाले. तैत्तिरीय आरण्यकात ‘वक्रतुण्ड’ आणि ‘दन्ती’ ही रुद्रदेवतेची विशेषणे आहेत. रुद्र हे शिवाचे मूळ रूप मानल्यास गणेशाच्या ‘वक्रतुण्ड’ आणि ‘दन्ती’ या विशेषनामांची संगती लागते.

हिंदू धर्मात सांप्रदायिक उपासनेला प्रारंभ झाल्यावर उत्पत्ती, स्थिती आणि लय ही अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, आणि महेश या देवतांची कार्ये भक्ताच्या उपास्यदेवतेकडे एकत्रितपणे संक्रमित झाली.

पिता सृष्टीचा निर्माता असताना, त्याचा कार्यसम्भार पुढे चालविण्याचा वसा घेतलेल्या गजाननातील ‘गज’ या पदाची मुद्गल पुराणातील ‘ग’ म्हणजे जेथे गमन करावयाचे आहे. अर्थात, लयस्थान आणि ‘ज’ म्हणजे जेथून जन्म प्राप्त होतो, अशी दिलेली व्युत्पत्ती गजाननाच्या सृष्टी निर्माण आणि लय या कार्यांची बोधक आहे. येथे ‘गज’ शब्द ब्रह्माचा वाचक आहे. ‘त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि’ या अथर्वशीर्षातील वचनाची उपपत्ती जाणण्यासाठी तैत्तिरीय उपनिषदातील (३.१) ‘यतो वा इमानि भूतानि जायन्ते। येन जातानि जीवन्ति। यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति। तद्विजिज्ञासस्व। तद् ब्रह्मेति।’ ज्यापासून हे प्राणिमात्र निर्माण झाले आहेत, जन्माला आलेले प्राणिमात्र ज्याच्या आधारे जगतात आणि ज्याच्याकडे वाटचाल करीत असताना ज्यात प्रवेश करतात, ते तत्त्व जाण. ते ब्रह्म आहे. हा वरुणाने भृगूला केलेला उपदेश जाणणे आवश्यक आहे. सारांश, गणेश ब्रह्मरूप असल्यामुळे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे त्याचे कार्य आहे.

गणेश ओंकाररूप आहे. तो ‘अ’, ’ऊ’, ‘म्’ या वर्णांनी निर्दिष्ट केलेल्या जाग्रत्, स्वप्न व सुषुप्ती अवस्थांच्या पलीकडे आहे. गणेशव्रत चतुर्थी (चौथ्या) तिथीला करतात. कारण गणेश जीवात्म्याच्या जाग्रत्, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पल्याड आहे. तुरीय (चौथी) अवस्था मुक्ती दर्शविते. ब्रह्म असलेला गणेश सदैव मुक्त आहे. तो सदैव चौथ्या मुक्तिरुपी अवस्थेत आहे.म्हणून त्याला चौथी तिथी प्रिय आहे.

मूर्तीविज्ञानविषयक प्रतीकात्मकता

अथर्वशीर्षातील ‘एकदन्तं चतुर्हस्तं...’ या मंत्रात गणेशाच्या मूर्तीविज्ञानाचे निरूपण आढळते. पद्मपुराणात (उत्तरखण्ड २५०.२८-२९) बलरामाने केलेल्या मुसळाच्या प्रहाराने गणेश ‘एकदंत’ झाला, अशी आख्यायिका आली आहे. मात्र, गणेशाविषयी ‘द्विदंत’ अथवा ‘चतुर्दंत’ असेही निर्देश आढळतात. ब्रह्मवैवर्तपुराणानुसार त्याच्या उजव्या हातात लाडू अथवा मोदक व कमळ आणि डाव्या हातात परशू आणि त्याचा दात असतो. (१. गणपतिखण्ड ४४.८५ पासून)

एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङकुशधारिणम्।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्॥
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।
या अथर्वशीर्षातील मंत्रानुसार, गणेशाच्या हातात पाश आणि अङ्कुश असतो. काही मंदिरात त्याच्या हातात डाळींब तसेच परशू दाखविला आहे. यापैकी कमळ हे विश्वोत्पत्तीचे, पाश मुक्तीतील अडथळ्याचे, अङ्कुश नियत्रंणशक्तीचे, परशू दुष्टनिर्दालनाचे आणि डाळींब समृद्धी व प्रजननाचे प्रतीक आहे.

शैव सिद्धांतानुसर पती (शिव), पशू (क्षेत्रज्ञ जीवात्मा) आणि पाश (बंध - पारतंत्र्याचे प्रतीक) अशी तीन तत्त्वे आहेत. ईश्वर-पशुपती स्वतंत्र असून, जीव परतंत्र आहेत. त्यामुळे बद्ध जीवांच्या परवशतेचे कारण असलेला पाश हाती धारण करून गणेश जीवांना, ते संसाराच्या पाशात बद्ध आहेत, त्यांनी मुक्तीची आस बाळगावी, असा संकेत देतो. ‘शूर्पकर्ण’- ‘सुपासारखे कान असलेला’ हे विशेषण गणेश ही कृषिदेवता होती असे सूचविते. शिवाय, गणेश ज्ञानदेवता आहे. विशाल कान त्याच्या बहुश्रुततेचे प्रतीक आहेत. गणेश ही कृषिदेवता असल्यामुळे तो शरीरावर पिकांच्या सुबत्तेचे प्रतीक असलेले सर्प धारण करतो. शिवपुत्र असल्यामुळे तो त्रिनेत्र - सर्वसाक्षी, सर्वज्ञ आहे. तो लंबोदर आहे. कारण, संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या उदरात सामावले आहे.

गणेशाचे वाहन मूषक आहे. मूषक शब्दाची व्युत्पत्ती ‘मुष्’ या धातूपासून झाली आहे. ‘मुष्’ म्हणजे ‘चोरणे.’ पुराणकथांमध्ये काळा उंदीर रात्रीचे व शुभ्र उंदीर दिवसाचे प्रतीक दर्शविले आहे. दिवसरात्र प्राणिमात्राचे आयुष्य चोरत असतात. त्या अविरत चालणार्‍या कालचक्रामुळे आयुष्यमर्यादा कमी-कमी होत जाते आणि एकाएकी मृत्यू समोर येऊन ठेपतो. गणेशदेवतेला मृत्यूचे भय नाही. म्हणून काळा उंदीर त्याच्या आसनाखाली दाखविला असतो. रुद्राची गणना एकादश आदित्यांमध्ये केली जाते. रुद्र, शिव आणि गणेश यांचा परस्पर संबध पाहिल्यास गणेश सूर्याशीदेखील संबंध आहे. त्यामुळे अंधार काळ्या उंदराच्या रुपात प्रकाशाच्या देवतेला-सूर्याला शरण येऊन त्याच्या पायाशी बसला आहे, असेही म्हणता येईल. ग्रीक पुराणकथांनुसार, ‘अपोलो’ या सूर्य आणि प्रकाशाच्या देवतेला ‘उंदरांची देवता’ असे एक अभिधान असून, तिच्या पायाशी एका पीठावर उंदीर विराजमान झालेला दाखविला आहे.

सारांश, गणेश ही ज्ञानाची देवता असल्यामुळे ती अज्ञानरुपी अंधार नष्ट करते. उंदीर हा अंधाराच्या शरणतेचे प्रतीक आहे. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार (३.१३.१२) पृथ्वीदेवतेने गणेशाला वाहन म्हणून उंदीर दिला. या आख्यायिकेची उपपत्ती पुढीलप्रमाणे लावता येईल. सांख्यदर्शनानुसार तमोगुण हा निद्रा, तंद्रा, आळसाचे प्रतीक आहे. तो ज्ञानप्राप्तीमधील अडथळा आहे. त्यामुळे त्यावर विजय मिळविणे आवश्यक आहे. आळसाचा त्याग करून रजोगुणाचा परिणाम असलेल्या क्रियाशीलतेकडे तसेच सत्त्वगुणाचा परिणाम असलेल्या ज्ञानाकडे वाटचाल करावयाची असेल तर तमोगुणाचे दमन केले पाहिजे. गणेशाच्या पायाशी असलेला उंदीर तमोगुणाच्या दमनाचे प्रतीक आहे. सिंह, मोर, हत्ती आणि शेषनागदेखील गणेशाची वाहने आहेत.

गणेश मूलाधारप्रतिष्ठित आहे. (त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्। अथर्वशीर्ष) मूलाधार चक्र आणि तेथील कमळ लाल रंगाचे असल्यामुळे गणेशाला लाल रंग प्रिय आहे. गणेशाचा पिता शिव ‘तांडव’ नृत्यासाठी, तर माता ‘लास्य’ नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. नृत्याचा वारसा गणेशाकडेही आला असून, नृत्यमुद्रेतील त्याच्या मूर्तीदेखील आढळतात.

गणेशाने व्यासाचा लेखनिक म्हणून महाभारत एकटाकी लिहून काढले, अशी हिंदूंची धारणा आहे. पेशवेकाळात गणेशोपासनेला राजाश्रय लाभला. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ करून समाजाचे प्रबोधन केले. भक्ती आणि श्रद्धेला कर्माची जोड देऊन त्यांनी समाजाला क्रियाशीलतेकडे वळविले. स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा साधन म्हणून वापर केला. अशा रितीने असाध्य ते साध्य करण्याकरिता लोकमान्य टिळकांनी डोळस प्रयत्नांना श्रद्धा आणि भक्तीची जोड दिली.

गणेश देवता हिंदू धर्मातील समन्वयाचे परिपूर्ण प्रतीक आहे. वैदिक आणि पौराणिक देवता, पृथ्वीस्थानीय, अंतरिक्षस्थानीय तसेच द्युस्थानीय देवता तिच्यात सामावल्या आहेत हे ‘त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि॥ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि॥ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥ ४॥ त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्॥६॥’ या मंत्रावरून ध्यानी येते. एवढेच नाही, तर गणेशाला ब्रह्मा आणि ब्रह्म संबोधिल्यामुळे सगुण व निर्गुण ब्रह्माचा समन्वय त्याच्या ठायी आढळतो. गाणपत्य संप्रदायाला जातिभेद मान्य नाही, म्हणून बहुजनांचा समन्वय त्याने साधला आहे.

अशा सर्वसमावेशक गणरायाला मनोभावे वंदन!

डॉ. कला आचार्य
kala.sanskrit१०८@gmail.com

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.