मुंबई : एकीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांवर ईडीची टांगती तलवार असून दुसरीकडे एका अभिनेत्री विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अभिनेता सलमान खान सोबत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री जरीन खान विरोधात कोलकतामधील सियालदह न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. फसवणूक केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जरीनविरोधात २०१८ साली ६ कार्यक्रमांमध्ये सामिल न झाल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकत्तामध्ये ६ ठिकाणी काली पूजा कार्यक्रमात ती सहभागी होणार होती, पण पैसे घेऊनही तीची अनुपस्थिती असल्यामुळे फसवणूक केल्याची तक्रार एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून नारकेलडांगा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून जरीनने १२.५ लाख रुपये घेतल्याचा आरोपदेखील करण्यात आला. तिच्याविरोधात तक्रारीनंतर नारकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर जरीनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, जरीनविरोधात तक्रार केल्यानंतर तिने कोर्टात वारंवार हजेरी न लावल्यानंतर अखेर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले.
अभिनेत्रीची प्रतिक्रिया
या प्रकरणाबद्दल बोलताना जरीनने प्रतिक्रिया दिली की, या गोष्टी खऱ्या नाहीत. माझ्याबाबत अशा बातम्या आल्यानंतर मी स्वत: देखील हैराण आहे. मी माझ्या वकिलांकडून याप्रकरणी माहिती घेत असून त्यानंतरच तुम्हाला याबाबत गोष्टी स्पष्टपणे सांगू शकेन. पुढे ती असं देखील म्हणाली की, कार्यक्रमाच्या आयोजकांनी खोटी माहिती दिल्याचे म्हटले. आधी त्यांनी या कार्यक्रमात कोलकत्ताचे मुख्यमंत्री आणि इतर नेते सहभागी होणार असल्याची माहिती दिली होती, पण नंतर तिच्या टीमला हा एक लहानसा कार्यक्रम असल्याचे समजले.