बाप्पांसाठी खास गोडाच्या नैवेद्याची आरास

    18-Sep-2023
Total Views |

ganpati

मुंबई :
महाराष्ट्रात तर गणेशोत्सव दणक्यात साजरा होतोच पण पूर्ण भारतभरही हा सण उत्साहात साजरा केला जातो. या लाडक्या बाप्पासाठी देशातल्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य केले जातात. प्रसादाचे खास पारंपरिक पदार्थ असतात. ते स्थानिक रीतीभातींप्रमाणे केले जातात. काही तिखट, काही गोड. काही ठिकाणी साखर आणि दूध तर कुठे गूळ आणि नारळ. एकूणच खाण्या - पिण्याची रेलचेल या काळात असते. स्थानिक साहित्य वापरुन अनेक पदार्थ विविध प्रांतात केले जातात. यंदा घरी आलेल्या गणपतीसाठी करुन पहा काही गोडधोड असा खास नैवेद्य, त्यासाठीच सोप्या पदार्थांच्या या काही आयडिया.

१) सुका मेवा मोदक


1

साहित्य - खजूर बी काढून बारीक तुकडे करून २ वाटी, सुका अंजीर तुकडे करून १ वाटी आणि याच्या अर्धे काजू, बदाम, चारोळी किसमिस पिस्ते अक्रोड खसखस (सर्व एकत्र)आवडीने प्रमाण घ्यावे. हे सर्व कोरडे शेकवून भरड पूड करून घ्यावे. वेलची - जायफळ पूड

कृती - खजूर अंजिर किंचित तुपावर थोडे लालसर करून घ्यावे.नंतर व्यवस्थित कुस्करून घ्यावे. त्यात भरड पूड घालून, वेलची जायफळ घालून एकत्र करून घ्यावे. हाताने लाडू बांधता आले पाहिजे. मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.

२) फ्रूट हलवा


2

साहित्य - केळी, अंजीर, चिकू , पेरू, मिक्स फ्रूट घ्यावीत

कृती - सर्व फळे मिक्सरमधून प्यूरी करून घ्यावीत. नॉनस्टिक पॅन मध्ये थोडे तूप घालून हा पल्प घालावा आणि मंद आगीवर ढवळत राहावे. किंचित घट्ट होऊ लागले की, अंदाजाने साखर घालावी. फळे गोड असतात, त्याबेताने साखर घ्यावी. मंद आगीवर परत ढवळत राहावे. मिश्रण बाजूने आळू लागले की, वेलची पूड, काजू घालून ढवळून काढावे.

३) काजू मोदक


3

 साहित्य - एक कप काजू, एक कप पिठी साखर, अर्धा कप मिल्क पावडर, चार चमचे पाणी, पाव चमचा रोज इसेन्स.

कृती - काजूची पूड करून घ्या. काजूची पूड, मिल्क पावडर आणि पिठीसाखर एकत्र मिक्स करुन घ्या. हे मिश्रण तीन मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या किंवा तव्यावर भाजून घ्या. मिश्रण थंड झालं की पाणी आणि रोज इसेन्स घालून गोळा मळून घ्या. मिश्रण मोदक साच्यामध्ये घालून मोदक वळून घ्या.

४) चॉकलेट मावा मोदक


4

साहित्य - २५० ग्रॅम खवा, १५० ग्रॅम पिठी साखर, १५० ग्रॅम डार्क चॉकलेट.

कृती - खवा पॅनमध्ये घालून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. खवा परतून झाला की त्यामध्ये किसलेलं चॉकलेट घालून मिक्स करून घ्या. खवा चॉकलेट मिश्रण थंड झालं की त्यामध्ये पिठी साखर घाला. चॉकलेट साच्यामध्ये घालून मोदक वळून घ्या

५) मोतीचूर लाडू



5

साहित्य - १) कप चणाडाळ, १ कप साखर +१/२कप पाणी, १ टीस्पून वेलची पावडर, २ चिमटी खाण्याचा रंग, ३-४ टेबलस्पून साजूक तूप, २ टेबलस्पून तळलेले काजू , पिस्ते सजावटीसाठी

कृती - प्रथम दोन ते तीन वेळा चणा डाळ स्वच्छ धुऊन घ्या नंतर त्यामध्ये पाणी घालून चणाडाळ चार तास भिजवून झाकून ठेवा. नंतरच्या डाळीमधले पाणी निथळून काढण्यासाठी चणाडाळ एका चाळणीत किंवा गाळण्यात घालून निथळत ठेवा. चणाडाळीमधले पाणी संपूर्णपणे निथळले की मिक्सरच्या चटणी अटॅचमेंट मध्ये ही चणा डाळ थोडी थोडी घालून पल्स मोड वर ठेवून ऑन ऑफ करा. असे एकूण फक्त चार वेळा करा म्हणजे चणाडाळ रवाळ दळली जाईल.आता एका तव्यावर थोडे साजूक तूप घाला.. या रवाळ दळलेल्या चणाडाळीच्या पसरट पातळ टिक्या करा आणि त्या टिक्क्या मंद आचेवर ३ते ४ मिनिटे तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूने झाकण ठेवून भाजा.‌आपल्याला हलकेच भाजायच्या आहेत, सोनेरी होईपर्यंत भाजायच्या नाहीत.. अशाप्रकारे सगळ्या टिक्क्या करून तुपावर भाजून घ्या. आता या टिक्क्या थंड झाल्यावर तोडून घ्या आणि परत मिक्सरच्या चटणी अटॅचमेंट मध्ये घालून पल्स मोडवर फक्त चार वेळा फिरवा म्हणजे टिक्क्या रवाळ दळलेल्या जातील आणि मोतीचूर लाडवासारखी बारीक बुंदी तयार होईल. आता एका पसरट कढईत मध्ये साखर घालून अर्धा कप पाणी घालून साखरेचा एकतारी पाक करून घ्या,त्यात वेलची पूड आणि खायचा रंग देखील घाला आणि..गॅस बंद करा आता चणा डाळीचे दळलेले मिश्रण हळूहळू या पाकात सोडा, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.आतापर्यंत गॅस सुरू करा आणि मंद आचेवर लाडवा चे मिश्रण थोडे कोरडे होईपर्यंत म्हणजेच चार ते पाच मिनिटे भाजून घ्या.. आता वेलची पावडर काजूचे तळलेले तुकडे घालून एकदा मिक्स करा. नंतर गॅस बंद करुन लाडवाचे मिश्रण झाकून ठेवा आणि पूर्ण थंड झाल्यावर लाडू वळावेत..पिस्त्याचे,काजूने सजवा.

६) मिक्स फ्रूट सलाड



6

साहित्य - मध्यम केळं, लहान सफरचंद, मध्यम संत्र, १ कप द्राक्षं, १/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे, ड्राय फ्रुट्स: २ टेस्पून बदामाचे काप, १ टेस्पून पिस्त्याचे काप, २ टेस्पून बेदाणे, १ टेस्पून काजू, १/२ कप कंडेंन्स मिल्क, १/२ कप दूध

कृती - सर्व फळं एकत्र करावीत. त्यात कंडेंन्स मिल्क आणि साधे दुध घालून मिक्स करावे. दूध आणि कंडेंन्स मिल्कचे प्रमाण कमी-जास्त होवू शकते. म्हणून आधी १/४ कप दूध आणि १/४ कप कंडेंन्स मिल्क एकत्र करून फळांमध्ये घालावे. मिक्स करून चव पाहावी. जर गोडपणा बरोबर असेल पण फ्रुट सलाड जास्त घट्ट झाले असेल तर थोडे साधे दुध घालावे. ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करावे.

७) पोह्याची बर्फी


7

पोहे बर्फी बनवण्यासाठी कढईत दूध गरम करून त्यात पोहे घालून ते चांगले घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यानंतर कढईत गूळ किंवा साखरेचा पाक बनवा. तसेच ड्रायफ्रुट्स दुसर्‍या पॅनमध्ये भाजून पोह्यात मिसळा. पोह्यांच्या मिश्रणात 3-4 चमचे तूप आणि साखरेचा पाक घाला आणि ते चांगले घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण शिजल्यावर ट्रेमध्ये शिफ्ट करा आणि बर्फीच्या आकारात कापून सर्व्ह करा.

८) अननस रायते


8

अनेकदा अननस दह्यात घातला की कडू लागतो. त्यासाठी अननस फोडींना साखर लावून मुरवत ठेवावे. निदान तासभर. अथवा साखर पाण्यात शिजवावे. दह्याचा चक्का करून मुलायम फेटून घ्यावे. त्यात आवडीने साखर घालून अननस फोडी घालून ढवळून लगेच वाढावे फार वेळ ठेवू नये.

दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित, MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.