मनोज जरांगे पाटीलांची तब्येत खालावली; रुग्णालयात दाखल
17 Sep 2023 18:23:28
मुंबई : गेला महिनाभर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे वादळ सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्याच्या अंतरवली सरटी गावात आंदोलक तब्बल १७ दिवस उपोषणाला बसले होते. मात्र उपोषण संपून आज तीन दिवसानंतर जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून जालन्याहून थेट छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आले आहे.
आंदोलनाच्या १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर त्यांच्याच हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास सांगितले होते. तेव्हा जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता.
उपोषणा दरम्यान १७ दिवस केवळ पाणी पिऊन उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात येताना त्यांनी रुग्णवाहिकेतूनच आंदोलकांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, उपचार घेण्यासंदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. उपचार घेतल्यानंतर परत मी उपोषण स्थळी जाणार आहे.