रसिकांवर अधिराज्य गाजविणार्‍या ‘अबोली’

    17-Sep-2023   
Total Views |
 Aboli Thosar


स्वच्छ, सुंदर आणि मोकळे स्वर आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची सुरीली बैठक असलेल्या अबोली ठोसर यांनी रसिकमनांवर अधिराज्य गाजविले, त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...

स्वच्छ, सुंदर आणि मोकळे स्वर व जोडीला शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची सुरीली बैठक असलेल्या अबोली ठोसर यांनी विविध कार्यक्रमांतून विविध प्रकारची गीते गाऊन रसिकमनांवर अधिराज्य गाजविले आहे. ३० वर्षांहून अधिक काळ संगीत साधना करणार्‍या अबोलीचा जीवनप्रवास जाणून घेऊया.अबोलीने स्वतःच्या गायनाने संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पण, तिची पहिली आणि सर्वांत महत्त्वाची ओळख म्हणजे डोंबिवलीतील नामवंत आणि सुविख्यात डॉ. नीळकंठ नारायण ठोसर यांच्या, त्या कन्या होत. डॉ. ठोसर आणि त्यांच्या पत्नी मीरा हे दोघेही संगीतप्रेमी. त्यामुळे खूप लहान वयातच त्यांनी अबोलीला शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यास पाठविले. अबोली लहान वयात शास्त्रीय संगीताचे धडे गिरवू लागल्याने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षीच म्हणजे बारावीत असतानाच अबोलीने गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीतविशारद’ पदवी संपादन केली.

डॉ. नीळकंठ हे त्यांच्या ‘डायग्नोसिस’साठी प्रसिद्ध असल्याने त्यांची ओळख सुप्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांच्याशी झाली. पुढे पुजारी यांच्यामुळे मराठी आणि हिंदीमधील सुप्रसिद्ध संयोजक अनिल मोहिले यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतूनच अबोलीने आपल्या करिअरच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. १९९३ला ‘मेंदीच्या पानावर’ या वाद्यवृंदाकडून त्यांना गाण्यासाठी विचारणा झाली आणि तिथूनच त्यांच्या संगीत प्रवासाची सुरेल वाटचाल सुरू झाली. या कार्यक्रमात ‘चाफा बोलेना, चाफा चालेना’, ‘वादळ वार सुटलंय गं’, ‘जांभूळ पिकल्या झाडावर’, ‘तुम्हावरी केली मी मर्जी बहाल’ इत्यादी गाण्यांनी ‘वन्समोअर’ मिळविला. ‘मेंदीच्या पानावर’ या कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात तसेच मध्य प्रदेश, इंदौर, उज्जैनी इत्यादी ठिकाणी एक हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत.

अनिल मोहिले यांच्यामुळे अबोलीला चित्रपट सृष्टीतील पहिले रेकार्डिंग ‘बॅकअप व्होकल आर्टिस्ट’ म्हणून काम मिळाले. त्यांना गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासमवेत ‘बॅकअप व्होकल आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावनेसा असा झाला होता. दोन-तीन रेकार्डिंगनंतर अनिल यांनी त्यांना लगेचच लता मंगेशकर यांच्या लाईव्ह स्टेज प्रोग्रॅममध्ये ‘बॅकअप व्होकल आर्टिस्ट’ म्हणून गायला बोलविले. अबोली यांनी १९९६ला लता मंगेशकर यांच्या ‘ये मेरे वतन के लोगो’ या कॅसेटच्या रेकार्डिंगसाठी लतादीदींसोबत कोरसमध्ये गाण्याची संधी मिळाली. १९९७ ला लता मंगेशकर यांच्या ‘क्वीन इन कन्स्पेट’ या कार्यक्रमात १८ वादकांबरोबर कोरसमध्ये सहगायिका म्हणून लतादीदींबरोबर अबोली यांनी आठ कार्यक्रम केले. अनिल यांनी अबोली यांना दिलेला ब्रेक त्यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला.

पुढे त्यांना चित्रपट सृष्टीत इतरही प्रोग्रॅम्स मिळू लागले. ‘रोशन्स्’, ‘जतीन ललित शो’, ‘इस्माईल दरबार’ असे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. त्यानंतर अबोली यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अबोली यांनी शो सोबतच टीव्हीवरील अनेक स्पर्धांमध्ये ही भाग घेऊन यश संपादन केले आहे. ‘सारेगम’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘स्टार यार कलाकार’ ज्यामध्ये ती जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर १००व्या एपिसोडला दिसली होती. तसेच, अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (एबीसीएल) यांच्या ‘स्टार ट्रेक’ या स्पर्धेसाठी ४० हजार प्रवेशिकांमधून निवडलेल्या ४० जणांमध्ये अबोली होती. दि. १९ नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी लता मंगेशकर यांचा अनुभव सांगणारा ‘लतादीदी एक अविस्मरणीय अनुभूती’ हा कार्यक्रम सादर केला होता. त्यापाठोपाठ ‘अफलातून आशा’ हा कार्यक्रम सादर केला. तसेच अनेक नवनवीन विषयावर कन्स्पेट शो ‘यमन रंग’ म्हणजेच यमन रागावर आधारित वैविध्यपूर्ण गायक, गायिका, संगीतकार आणि अनेक प्रकारची गाणी यावर आधारित त्यांचा कार्यक्रम दि. २६ मार्च २०२३ मध्ये डोंबिवलीतील सव्रेश सभागृहात झाला.
 
अबोली यांचे शालेय शिक्षण टिळकनगर विद्यालयात झाले. १९९३ला त्यांनी चर्चगेटला निर्मला निकेतनमधून ‘बीएससी’ (होम सायन्स) ही पदवी प्राप्त केली. अबोली यांनी विविध कार्यक्रमांतून भावगीते, नाट्यगीते, लावणी आणि चित्रपट गीते अशी मिळून हजारोंच्या संख्येने गाणी गायिली आहेत. टिळकनगर शाळेच्या सर्व बॅचेसचे दर तीन वर्षांनी एक स्नेहसंमेलन असते. ज्याचे नाव आवर्तन आहे. त्यात ही अबोलीचा एक गायक म्हणून सहभाग होता. या कार्यक्रमात शाळेतर्फे प्रमुख पाहुण्यांकडून अबोलीला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवाय, कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या ज्या महिलांचा सत्कार करण्यात आला त्यात अबोली ही होती.

तसेच, कल्याण येथील ‘रोटरी क्लब ऑफ डायमंड’च्यावतीने ‘जागतिक महिला दिना’निमित्त केलेल्या ‘महिला सन्मान सोहळ्या’त अबोलीला ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. आयष्यात आपल्याला ज्या काही संधी मिळाल्या, त्याचे श्रेय अबोली देव, आईवडील, गुरू यांच्यासह पै लायब्ररीचे संचालक पुडंलिक पै. श्रीरंग कुलकर्णी, अनेक सामाजिक संस्था, कला संस्थामध्ये कार्यरत असलेल्या दीपाली काळे, ज्येष्ठ पत्रकार मीना गोडखिंडी यांना देते. या सर्वांनीच अबोली यांना प्रोत्साहन दिले असल्याचे अबोली सांगतात. बहुगुणी असे व्यक्तिमत्त्व असलेल्या अबोलीला पुढील कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत‘कडून हार्दिक शुभेच्छा.-जान्हवी मोर्ये


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.