कोलंबो : मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी आणि त्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी टाकलेली नांगी यामुळे ‘आशिया चषका’च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला भारताविरुध्द खेळताना केवळ ५१ धावा करिता आल्या. भारताने हे आव्हान एकही गडी न गमावता पूर्ण केल्याने ‘आशिया चषका’वर आठव्यांदा भारताचे नाव कोरले गेले.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘आशिया चषका’च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारताचा सर्वांत वेगवान वनडे विजय म्हणून या सामन्याची नोंद झाली. भारताकडून गिलने २७, तर किशनने २३ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १५.२ षटकांत सर्वबाद ५० धावा केल्या. जसप्रित बुमराहने पहिल्याच षटकात श्रीलंकेला पहिला झटका देत कुसल परेराला बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करीत सहा जणांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने चौथ्याच षटकांत लंकेचे चार बळी टिपून पुरती दाणादाण उडवून दिली.
हार्दिक पंड्याने तीन गडी बाद करून लंकेचा संपूर्ण संघ गारद झाला. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ आणि दुसन हेमंथाने नाबाद १३ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.