बंगळुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या सौर मोहिमेला अपेक्षित यश मिळत असून, ‘आदित्य एल-१’नेशुक्रवारी पृथ्वी प्रदक्षिणेचे चार टप्पे अर्थात ’अर्थ बाऊंड मॅन्युव्हर’ यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती ‘इस्रो’ने ट्विटद्वारे दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-१’ ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. शनिवार, दि. २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘आदित्य एल-१’चे प्रक्षेपण झाले होते. या उपग्रहाला लॅग्रेंज पॉईंटपर्यंत पोहोचण्याकरिता चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, मोहिमेच्या १४व्या दिवशी चार अर्थ बाऊंड मॅन्युव्हर यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.
पाचव्या प्रदक्षिणेला ‘आदित्य एल-१’ तयार
‘आदित्य एल-१’ उपग्रहाचे पहिले अर्थ बाऊंड मॅन्युव्हर रविवार, दि. ३ सप्टेंबरला पूर्ण झाले. दुसरे मंगळवार, दि. ५ सप्टेंबर, तिसरे रविवार, दि. १० सप्टेंबर तर, शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर रोजी चौथे अर्थ बाऊंड मॅन्युव्हर पूर्ण झाले. यानंतर आता पाचव्या प्रदक्षिणेला ‘आदित्य एल-१’ तयार आहे. पाचव्या यशस्वी अर्थ बाऊंड मॅन्युव्हर नंतर उपग्रह ११० दिवसांच्या प्रवासासाठी लॅग्रेंज पॉईंटकडे रवाना होईल.