मुंबई : कॅनेडियन रॅपर गायक शुभ उर्फ शुभनीत सिंगचा शो कॉर्डेलिया क्रूझवर आयोजित करण्यात आला आहे. शुभने सोशल मीडियाद्वारे खलिस्तानच्या उघडपणे समर्थन केले आहे. अलीकडेच शुभने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे भारताचा विकृत नकाशाही दाखवला होता. मुंबईत त्याच्यासाठी एका मैफिलीचे आयोजन केले जात असून, या विरोधात शुक्रवारी भाजयुमो मुंबईच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांना निवेदन देऊन खलिस्तान समर्थक गायक शुभनीत सिंग यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि सर्व कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली आहे.
तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी करत शोचे आयोजक टीम इनोव्हेशन, ‘परसेप्ट लिमिटेड’ आणि कॉर्डेलिया क्रूसेस यांना शो रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले. तिवाना म्हणाले की, ‘’शुभचे सोशल मीडियावर एक दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यात भारतातील तरुणदेखील त्याच्याशी जोडलेले आहेत. अलीकडे, दि. 23 मार्च रोजी, शुभने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर जम्मू-काश्मीर आणि पंजाबशिवाय भारताचा नकाशा पोस्ट केला आणि पंजाबसाठी प्रार्थना नावाने कथा म्हणून आणखी एक पोस्ट केली. हे पूर्णपणे भारताच्या अखंडतेच्या विरोधात आहे. अशा गद्दारांना आपल्या देशात स्थान नाही आणि अशा लोकांवर ‘एफआयआर’ नोंदवून कडक कारवाई करावी, अशी आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे.”
‘खलिस्तान समर्थकांना भारतात स्थान नाही’
भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, “खलिस्तान समर्थक, भारताच्या एकतेचे आणि अखंडतेचे शत्रू यांना भारतात स्थान नाही. देश तोडण्याचा कट रचणार्या कॅनेडियन गायक शुभला आम्ही भारतात परफॉर्म करू देणार नाही. आता आम्ही शांततेने आयोजकांना आणि मुंबई पोलिसांना कार्यक्रम रद्द करण्यासाठी निवेदन दिले असून, योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करू. एका निवेदनाद्वारे आम्ही पोलिसांकडे मागणी केली आहे की कॅनडा रहिवाशी रॅपर शुभ याने भारत सरकार आणि देशाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल ‘एफआयआर’ नोंदवावा.”
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.