मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या औचित्यावर भक्तांना अडचण होऊ नये म्हणून या कालावधीत कुठलाही मेगाब्लॉक घेण्यात येऊ नये, अशी विनंती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मंत्री लोढा यांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कुठलाही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही, असे माहिती मंत्री लोढा यांनी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
''गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तो गणेश विसर्जनापर्यंत रद्द करण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश ललवानी यांच्याशी चर्चा केली होती. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही केलेली विनंती त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मुंबई रेल्वेत कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे,'' असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.