मुंबई : ‘आधार फाऊंडेशन’ (रजि.) आणि महिला बचतगट (‘पी उत्तर’ विभाग) आयोजित ‘जागर मंगळागौरीचा’ कार्यक्रमाचे नुकतेच मुंबई पब्लिक स्कूल, ए सेक्टर, दिंडोशी वसाहत, गोरेगाव पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने आलेल्या महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून जागर मंगळागौरीचा सोहळा पार पडला. श्रावण महिन्याचे औचित्य साधून महिला बचतगटांच्या माध्यमातून दिंडोशी विभागातील महिलांसाठी विशेष अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी ठेवण्यात आली होती. नोंदणी झालेल्या १२०० ते १५०० महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. महिलांचे खेळ आणि खेळाचे आकर्षण व बक्षीसे हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांच्या मुंबई ते जिल्हा स्तरावर विधानसभा आणि प्रभाग स्तरावरील महिला पदाधिकारी तसेच सामाजिक संस्था, संघटना, फेडरेशन, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा सेविका, मुंबई महापालिका स्वच्छता विभाग आरोग्य विभाग यांची विशेष उपस्थिती होती. धनलक्ष्मी, स्त्री शक्ती, अथर्व, जय भवानी, साई दर्शन, आम्रपाली, स्वस्तिक, हिरकणी, वाघेश्वरी या महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनुक्रमे अक्षता कदम, रश्मी मोरे, रोहिणी राऊत, स्वाती शिर्के, स्नेहा दळवी, वंदना बोराडे, सीमा घोरपडे, संध्या निकम, प्रिती विचारे तसेच विविध महिला बचत गट, जयश्री बागल (सदस्य) आणि संस्थेच्या अध्यक्षा सारिका किरण बागल, या सर्वांच्या आयोजनात जयकांत शीक्रे (मुख्य सदस्य), विजयकांत पाठक, मेषक नायडू, हितेश जाधव, श्री यश, आशिष, मयूर, आराध्य, हरप्रित, अंजनी आदी संस्था स्वयंसेवक यांच्या नियोजनात पार पडला.
सकल मराठा समाज, राजमाता जिजाऊ कट्टा, मालाड गोरेगाव पूर्व, येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीत महादीपोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि संस्थेचे सदस्य व्हावे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक कार्यक्रमात संस्थेबरोबर सहभागी होता येईल आणि प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद लुटता येईल, असे आवाहन ‘आधार फाऊंडेशन’ संस्थेचे संस्थापक किरण विश्वनाथ बागल यांनी यावेळी केले.