सन २०२० गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १०९ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारस यांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप
पाचवा टप्पा ; १५ जुलैपासून आजतागायत १०९६ यशस्वी पात्र गिरणी कामगार /वारसांना सदनिकेचे चावी वाटप
16-Sep-2023
Total Views |
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील यशस्वी पात्र १०९ गिरणी कामगार / वारस यांना आज पाचव्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप आज करण्यात आले. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन आदी उपस्थित होते.
आमदार सुनील राणे म्हणाले की, आतापर्यंत सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या ९८७ गिरणी कामगारांना १५ जुलै २०२३ पासून चार टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. आजच्या पाचव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची सुवर्णसंधी गिरणी कामगार/ वारस यांना मिळाली असून याबद्दल समाधान वाटत असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सांगितले.
मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम वेगात सुरू आहे. या गिरणी कामगार / वारस यांची पात्रता लवकर निश्चित करून त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सांगितले. मिलिंद बोरीकर म्हणाले की, मुंबई मंडळामार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद /आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील पहिला मजला, कक्ष क्रमांक २४०, पणन कक्ष येथे सुरू करण्यात आले आहे.
गिरणी कामगार/ वारसांना पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. गिरणी कामगार/ वारसांनी म्हाडा मुख्यालयात येऊन प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याव्यतिरिक्त, www.millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये mill workers eligibility या नावाने ॲप उपलब्ध असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन बोरीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिळकत व्यवस्थापक रामचंद्र भोसले आदींसह अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.