रसिका शिंदे-पॉल
मुंबई : ऋषिकेश जोशी लिखीत आणि दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हलका-फुलका विनोद पण विचार करायला लावणारे कथानक या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यात अभिनेते आनंद इंगळे यांनी महत्वपुर्ण भूमिका साकारली असून चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी महाएमटीबीशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मराठी चित्रपट हे आजही कथानकावर चालतात आणि प्रेक्षकांची मने जिंकतात असे मत अभिनेते आनंद इंगळे यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले आनंद इंगळे?
“मराठी चित्रपट हा कायमच कथेशी निगडीत होता. कथेनेच तो समृद्ध आहे. यात परदेशात होणारे चित्रिकरण ही अधिक अभिमानाची बाब आहे. समर्पक विषय असेल जो परदेशात चित्रिकरण करण्याची गरज असेल तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मराठी दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षक चित्रपटाच्या कथेला महत्व देतात. अजूनही मराठी चित्रपट हा आशय, विषय, कलाकार, दिग्दर्शन, संगीत या विविध अंगामुळे उभा आहे”.
तीन बिनधास्त मित्र मजा करायला विदेशात जातात आणि तिथे त्यांच्याबरोबर एक अनपेक्षित घटना घडते. त्या रात्री पार्टीनंतर नेमकं काय घडले आणि हे तीन मित्र कसे अडकले? त्यांची ही मजा, सजा कशी बनली, हे २९ सप्टेंबरला प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल. या सगळ्या घटनेमुळे या तिघांची मैत्री टिकते की नाही? या जाळ्यात अडकलेले हे तीन सीताराम कसे बाहेर पडतील, हे पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे सांच्यासह आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी अशी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.