कल्याण : केंद्र सरकारच्या स्मार्ट ’सिटी प्रकल्प’अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक बाहेरील वली परी रोड ते महात्मा फुले चौक परिसर येथे विविध प्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्पाचे स्थानक परिसरात काम सुरू असल्याने येथील वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच शुक्रवार, दि. १५ रोजी दुपारी १ वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे ’स्मार्ट सिटी’चे काम सुरू असलेल्या ठिकाणी (खड्डे खणून ठेवल्याने खडड्यांत रिक्षा, स्कुटी अडकल्याने) सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन वाहन चालक कोंडीत अडकले होते.
कल्याण जंक्शन म्हणून ओळखला जाणार्या या गर्दीच्या परिसरात रोज ३० हजार रिक्षांचा गराडा असतो. त्यातच बेशिस्त रिक्षाचालक, अधूनमधून घुसखोरी करणारे टांगेवाले, रस्ता अडवून बसलेले फेरीवाले, दारू पिऊन रस्त्यात पडलेले गर्दुल्ले, अरूंद रस्ते, बकाल परिसर अशा एक ना अनेक समस्यांच्या चक्रव्यूहात हे शहर अडकले आहे. याचा थेट परिणाम लाखोंच्या संख्येने रोज मुंबईला जाणार्या चाकरमान्यांवर होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या वाहतूककोंडीवर कोणतीच उपाययोजना होत नसल्याचे घरातून लवकर निघूनसुद्धा रोजचा लेटमार्क लागत आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या बाबतीत कल्याणची ओळख लेटमार्कवाल्यांचं कल्याण, अशी झाली आहे.
कल्याण पश्चिमेला रेल्वे स्टेशन बाहेरील व शहरातील वाहतूककोंडी दूर व्हावी, यासाठी कल्याण-डोंबिवली शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत एक हजार, ७० कोटींच्या खर्चाच्या मंजूर प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. त्यामधील वली परी रोड ते महात्मा फुले चौक परिसर या ठिकाणी ५०६ कोटींची प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या प्रकल्पामुळे स्थानक बाहेरील परिसरात वाहतूककोंडी होते. त्यातच कल्याण बस डेपो हा अडथळा ठरत आहे. या संदर्भात कडोंमपा आयुक्त डॉ. दांगडे यांची बैठक झाली होती. वाहतूक विभाग, रेल्वे, वाहतूक पोलीस, एसटी डेपो, महापालिका व‘स्मार्ट सिटी’चे अधिकारी उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉक्टर दांगडे यांनी कल्याण एसटी डेपो विठ्ठलवाडी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा डेपो अद्याप स्थलांतरित झालेला नाही.
सर्वच यंत्रणा अपयशी
कल्याण एसटी डेपो परिसरात प्रकल्पाचे काम सुरू असल्याने पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यामध्ये सर्वच यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाठण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर धावणारा चाकरमानी मात्र कोंडीत अडकला आहे.