मुंबई : मुंबईतील मोकळ्या जागांच्या वापराबाबत आणि त्या जागा दत्तक देण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने एक संकल्पना तयार केली असून त्यासंदर्भात शुक्रवारी महापालिका मुख्यालयात एक संयुक्त बैठक झाली. त्यात उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शहरातील भूखंड आणि त्याबाबत केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
”मुंबई महापालिका प्रशासनाने ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी अर्थात मोकळ्या जागा दत्तक घेण्याच्या धोरणाच्या संदर्भात पारदर्शकता ठेवावी,” असे निर्देश लोढा यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. तसेच येत्या ३० दिवसांत याबाबतची सुधारित माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मोकळ्या जागा दत्तक घेण्याच्या संदर्भातील धोरणावर चर्चा करण्यासाठी महापालिका मुख्यालयात ही बैठक झाली. त्यात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह पालिकेचे अधिकारी, मुंबईतील काही अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी, मुंबईकर नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मंत्री लोढा म्हणाले की, ”प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी मुंबई महानरपालिकेच्या अखत्यारीत किती मोकळ्या जागा आहेत, त्या पैकी किती जागांवर उद्याने आहेत, रिक्रियेशनल स्पेसेस किती आहे, मैदाने किती आहेत, त्यापैकी किती जागा ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी मध्ये येऊ शकतात या बद्दलची सर्व माहिती पुढील ३० दिवसात महापालिकेच्या संकेस्थळावर प्रकाशित केली पाहिजे. जागांची सद्यस्थिती तसेच त्याबद्दलचे भविष्यातील नियोजन नागरिकांपर्यंत पोहोचावे जेणेकरून पारदर्शकता टिकवता येईल आणि नागरिकांचा विश्वास अधिक वृध्दींगत होईल,” अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीत पालिकेचे धोरण, त्यातील तरतुदी, संभाव्य बदल, आवश्यकता यासह विविध मुद्द्यांवर मोकळेपणाने साधकबाधक चर्चा झाली. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या सूचनांची नोंदही प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
उपस्थितांनी मानले लोढांचे आभार !
दरम्यान, ”मंत्री स्वतः जनतेला सोबत घेऊन एखाद्या विषयावर अशाप्रकारे मुक्त चर्चा करण्याच्या घटना फारशा दिसत नाहीत. अशा प्रकारे मंत्री लोढा सहजपणे पालिका मुख्यालयात येऊन स्थानिकांसोबत बसून चर्चा करत असून आम्हाला बोलण्याची संधी देत आहेत,” अशी भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली. तसेच ”ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी लोढा यांच्या सहजतेचे आणि प्रत्येकाला उत्तर देण्याच्या गुणाचे कौतुक केले.
सर्वांनी मोकळेपणाने आपले मत मांडावे आणि त्यातून एक जनहिताचा निर्णय व्हावा यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपले आभार, या नंतर सुद्धा आपल्याच सहकार्याने या विषयाबाबत पुढील निर्णय घेतले जातील. जनमत ऐकण्यासाठी घेण्यात आलेली ही पहिली बैठक आहे पण या पुढे सुद्धा अश्या अजून बैठका होतील. धोरणाबाबत मत मतांतरे असू शकतात पण त्यातून एक सुवर्ण मध्य काढून हिताचा निर्णय व्हावा इतक्याच आपल्या संवादाचा उद्देश आहे. असे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बैठकीत सांगितले.