मुंबई: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड बॉडी बॅग खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. त्यांची आज तिसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. किशोरी पेडणेकर तिसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर आहेत. यापूर्वी त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली होती.
महापालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.