मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीच्या निमित्ताने ठाकरे गटाने मागच्या घोषणांचे काय झाले? ते ही सांगा असे म्हणत टीका केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला खडेबोल सुनावले आहेत. तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "आम्ही मंजुर केलेल्या योजनांचा मुडदा पाडण्याचे काम तुम्ही केले आणि आता वर आम्हालाच विचारता की मराठवाड्यासाठी तुम्ही काय केले? अडीच वर्ष तुम्ही काय माशा मारत होतात का? मराठवाड्यासाठी वाॅटरग्रीड सारखी योजना दिली, त्याचा तुम्ही मुडदा पाडला. योजनांचे मुडदे पाडायचे आणि वर पुन्हा मराठवाड्यासाठी काय केले असे विचारायचे? हा म्हणजे विरोधकांचा कावाच म्हणावा लागेल. मराठवाड्यात मंत्रीमंडळची बैठक होत असतांना राजकारण करणारे हे कावेबाज लोक आहेत. २०१६ मध्ये केलेल्या सगळ्या घोषणांची अंमलबजावणी आमच्या सरकारने केली आहे."
"एखादी योजना राहिली असेल तर काही अडचणींमुळे राहिली असेल. त्याची सगळी माहिती आम्ही देणार आहोत. पण अडीच वर्ष तुमची सत्ता असतांना तुम्ही काय केले? राहिलेल्या योजना पुर्ण करण्यासाठी किती प्रयत्न केले? उलट दिलेल्या योजनांचे मुदडे पाडण्याचेच काम तुमच्या काळात झाले." असा घणाघात ही फडणवीस यांनी केला.