मुंबई : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या बैठकीच्या सहा वर्षांनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचेही आयोजन छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री या बैठकीसाठी शहरात दाखल होणार आहेत. यावेळी होणार्या बैठकीत मराठवाड्यातील प्रश्नांवर चर्चा होतानाच काही महत्त्वाचे निर्णयदेखील घेतले जाणार आहेत. जेणेकरून मराठवाड्यावर असलेले कायम दुष्काळाचे सावट, बेरोजगारीचे प्रमाण आणि यासह इतर अनेक समस्यांवर फुंकर मारली जाईल.
कायम दुष्काळाच्या छायेत असणार्या मराठवाड्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. कालांतराने राज्यात झालेल्या सत्ता पालटानंतर या घोषणा महाविकास आघाडीकडून दुर्लक्षित ठेवल्या गेल्या आणि मराठवाडा उपेक्षितच राहिला. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले असून, फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीनंतर सहा वर्षानंतर बैठकदेखील आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीतून मराठवाड्यासाठी काही भरघोस तरतूद केली जाणार का? या आशेने मराठवाडा सरकारकडे पाहत आहे.