सामाजिक समरसतेचे दूत : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी

    16-Sep-2023   
Total Views |
Article On Prime Minister Narendra Modi

सत्ता केवळ सेवेचे साधन, असे मानत भारताच्या अत्यंजांचा विकास करण्यासाठी कार्य करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस. विश्वात आज नरेंद्र मोदींच्या कार्याचा नावाचा डंका वाजत आहे. त्यांचे राजकीय विकासात्मक कार्य, यावर चर्चा होतात. मात्र, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या नरेंद्र मोदींचे सामाजिक समरसता तसेच महिला-बाल सशक्तीकरणासंदर्भातले विचार आणि कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. या लेखात त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वातल्या या पैलूचा सारांश रुपाने आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मागासवर्गीय समाजाची दिशा काय आहे? समता की समरसता? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मला वाटते की, देश आंतरिकरित्या सशक्त तेव्हाच होईल, जेव्हा देशात समरसतेचे वातावरण असेल. देशाच्या अंतरिक शक्ती आणि एकतेसाठी केवळ समताच पुरेशी नाही, तर त्यासोबत देशात समरसतेचे वातावरण हवे. उदाहरणार्थ, मागासवर्गीय समाजाची व्यक्ती डॉक्टर होऊ शकते. पण, त्याने सगळेच प्रश्न संपणार नाहीत. केवळ नोकरी आणि शिक्षणच पुरेसे नाही, तर सामाजिक सुरक्षा आणि सन्मानही हवा. समभावाबरोबर ममभावही हवा. समभावासोबतच ममभाव म्हणजे समरसता,”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दशकांपूर्वी म्हटले होते. कारण, संघाचा स्वयंसेवक ते पंतप्रधान आणि आता अगदी जागतिक स्तरावर नेतृत्व करणार्‍या नरेंद्र मोदी सामाजिक समरसतेचे विचार प्रत्यक्ष जगतात.

काही वर्षांपूर्वी भाजपने अहमदाबाद महानगरपालिका निवडणुका जिंकल्या. त्यावेळी द्वारकापीठचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरुपानंदजी अहमदाबाद येथे आले. अहमदाबाद महानगरपालिकेने त्यांचा सार्वजनिक सत्कार करण्याचे ठरवले. त्यावेळी नरेंद्र मोदी कोणत्याही सत्ताधारीपदावर नव्हते. मात्र, त्यांनी अहमदाबादमध्ये सत्तेत आलेल्या लोकांना म्हटले की,”वाल्मिकी समाजामध्ये पहिल्यांदा एका मुलीने डॉक्टरेट (पीएचडी) मिळवली आहे. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरुपानंदजी यांच्या हस्ते या कन्येचा सत्कार करण्याचे नियोजन करायला हवे.” वाल्मिकी समाजाच्या शारदाबहन वडादरा यांचा सन्मान जगद्गुरू शंकराचार्यांच्या हस्ते करण्यात आला. गुजरातच्या ज्ञात इतिहासात पहिल्यांदाच हे घडत होते की, वाल्मिकी समाजाच्या भगिनीचा सत्कार शंकराचार्यांनी केला. शारदा यांचा सत्कार करायलाच हवा. कारण, जातीयतेच्या विखारातही प्रचंड कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक संघर्ष करीत ‘पीएचडी’ प्राप्त केली होती. या भगिनीच्या सन्मानाचा भाव नरेंद्र मोदी यांच्या मनातूनच उमटू शकतो.
त्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतरही वाल्मिकी समाजातील बालिकांमध्ये आई अंबेचे रूप पाहत, त्या बालिकांचे पाद्यपूजन करणारे नरेंद्र मोदीही जगाने पाहिले.

केवळ सन्मान आणि पूजन करून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, हे नरेंद्र मोदी यांनाही माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये महिलांसाठी कार्यान्वित केलेल्या सगळ्या योजनांवर जरी लिहिले, तरी भारतीय स्त्रियांच्या समरस प्रगतीचा एक आलेखच तयार होईल. काल-परवा पाण्यासाठी आणि स्वयंपाकघरात इंधनासाठी वापरता येईल. म्हणून लाकूडफाटा गोळा करण्यासाठी मैलोन्मैल चालणार्‍या आयाबायांची जगण्याची शैलीच आज मोदींच्या सत्ताकाळातील ‘उज्ज्वला योजना’ आणि स्वच्छ जलसंदर्भातील योजनांनी बदलली आहे. ‘घरघर शौचालय योजना’ तर खर्‍या सामाजिक समरसतेची नांदीच. कारण, घरात शौचालय नाही म्हणून गावात हागणदारी. मोठ्या घरातले वृद्ध, रूग्ण यांनी घरात शौच केली, तर ती साफ कोण करणार? घरातल्या आयाबाया नाही तर दुर्देवाने मागासवर्गींय समाजाचा एक गट जो डोक्यावर मैला वाहून नेई.

पण, ‘घर घर शौचालय योजना’ देशभरात राबवली गेली. माणसाने मैला वाहून नेण्याच्या दुर्देवी वाईट काम बंद झाले. घरघर शौचालयांनी लेकीसुनांची भयंकर कुचंबणेतून सुटका केली. हे सगळे प्रश्न स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही होते. पण, त्या प्रश्नांची उकल नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरच झाली. कारण, समाजातील उपेक्षित घटकांचे मग ते स्त्री असू देत की पुरूष, अत्यंज स्तरावरील प्रत्येक व्यक्तीला जगण्यातील साध्या-साध्या गोष्टीतही सुरक्षा आणि सन्मान मिळायलाच हवा. माणूस सुखी व्हायला हवा, असे नरेंद्र मोदी यांचे मत आहे. हे जे मत आहे ना, तोच सामाजिक समरसतेचा मूलभूत अर्थ आहे.

मला आठवते की, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. त्यावेळी आम्ही काही लोक गुजरातला बडोद्याला ऐतिहासिक वास्तूला भेट देणार होतो. वास्तू सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुली होती. आम्ही पोहोचलो ६ वाजून १ मिनिटांनी. वास्तूचे आतले सर्व प्रवेशद्वार बंद करून बाहेरचे प्रवेशद्वार बंद करण्याची तयारी सुरू होती. इतक्या दूर आलो आणि वास्तू पाहता येणार नाही. मग लोकांनी तिथल्या सुरक्षारक्षकाला प्रवेश श्ाुल्कापेक्षा दहापट रक्कम देऊ असे सांगितले. मात्र, सुरक्षारक्षक काही केल्या ऐकेना. म्हणून मग त्याच्या साहेबांकडे लोक गेले. यावर साहेबांनी सुरक्षारक्षकाला बोलावले. त्याला म्हणाले की, ”बघ बाबा, हे काय म्हणतायत. अतिरिक्त पैसे देतायत. हे बघा, दुनिया इकडची तिकडे झाली तरी दिलेल्या वेळेचे नियम पाळण्याचे आदेश दिलेत आमच्या बापाने.” बाप कोण? हे विचारल्यावर तो म्हणाला की, ”बाप म्हणजे आमचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. तुम्ही आम्हाला लाख रुपये दिले, तरी आम्ही नियम तोडणार नाही. कारण, आज उद्या कधी ना कधी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली, तर आमची नोकरी जाईल. ते एक पैसा खात नाहीत आणि खाऊही देत नाहीत. ते आल्यापासून आम्ही सगळे हा नियम पाळतो.” गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले आणि त्यांनी ‘देशभर ना खाऊंगा ना खाने दुंगा’चे सूत्र प्रशासनात कार्यान्वित केले, तेव्हा आश्चर्य वाटले नव्हते. कारण, भ्रष्टाचार विरोधातला अंगार त्यांच्यात आधीपासूनचाच होता, हे अनुभवले होते.

असो. नरेंद्र मोदी नावाचे भय समाजकंटकांना किती वाटते किंवा ते नरेंद्र मोदी यांच्या भयाने भोळ्या लोकांना कसे शोषण करतात, हे अनेकदा अनुभवले आहे. गोवंडी डम्पिंग ग्राऊंडवर गेले होते. त्या दुर्गंधीयुक्त डोंगरावर जाणे म्हणजे काय, हे शब्दात सांगू शकत नाही. त्या डोंगरावरही मुस्लीम वस्ती आढळली. पाणी नाही, शौचालय नाही, वीज नाही, अगदी पशूसारखे जगणे. तिथे समाजवादी पक्षाचे, अबू आझमीचे कार्यकर्ते होते. तिथले गरीब लोक आमदाराबद्दल भरभरून बोलत होते. म्हणत होते की,”इन्शाअल्ला हमारे कोम का आदमी हैं वो” मी विचारले, तुम्ही इथे बेकायदेशीर राहता, त्यामुळे तुम्हाला कोणतीच सुविधा मिळत नाही. याबद्दल तुमचे कौमचे साहेब काही का करीत नाहीत? यावर त्यांच्यातला एक युवक म्हणाला की, ”अब क्या बताये, तो बसलाय ना वर. तो हिंदू आहे ना? आम्ही मुसलमान आहोत. आमचे साहेब तर दररोज इथपर्यंत पाण्याची वाहिनी टाकण्याचा विचार करतात. पण, त्यांनी जलवाहिनी टाकली की, तो लगेच वरून बघतो आणि ती जलवाहिनी कापून टाकतो. आमच्याकडे २४ तास लक्ष ठेवून आहे तो.” तो कोण? मला उलगडा झाला नाही. यावर लोक म्हणाले की, ”तो म्हणजे मोदी. तो आमची जलवाहिनी कापतो. साहेब के लोग झुट थोडी ना बोलेंगे.”(साहेब म्हणजे त्यांचा आमदार) हे ऐकून तेव्हा हसावे की रडावे कळाले नाही, तर अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचा दैवयोग मला आला होता.

तेव्हा मी भारतीय जनता पक्षामध्ये पदाधिकारी होते. मुंबई महिला मोर्चातर्फे नरेंद्र मोदी यांच्या प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करण्यात आले. गुजरातच्या प्रगतीमध्ये योगदान असलेल्या उपक्रमांना भेट देण्याचेही नियोजन करण्यात आले होते. सगळ्यात शेवटी प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होता. त्यांनी मराठीतून आमचे स्वागत केले. राष्ट्र, समाज, धर्म, विकास यावर मनोगत मांडले. आम्हाला म्हणाले की, ”मीच बोलतोय, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा.” पदाधिकार्‍यांनी प्रश्न विचारले. त्यांनी अतिशय समर्पक आणि विस्तृत उत्तरं दिली. मी त्यांना विचारले, “सर, तुम्ही इतके लोकप्रिय आणि यशस्वी कसे आहात?” त्यावर ते म्हणाले होते की, ”माझ्या आयुष्याचा मंत्र की, जिथे असेन तिथे मनापासून निष्ठेने काम करतो. त्या कामाने समाजाचे आणि देशाचे कसे भले होईल, ते पाहतो.

मला सांगा मुंबईत एखादी घटना घडली आणि तुम्हाला त्या घटनेविरोधात काही करायचे आहे, तर काय करता? ”मी म्हणाले, “आंदोलन किंवा सभा.” ते म्हणाले, “कुठे करता?” यावर सगळ्या जणी म्हणाल्या, “आझाद मैदान किंवा बीकेसी.” यावर ते म्हणाले की, ”आंदोलनं गरजेची आहेत. मात्र, ज्याच्यासाठी आपण ते आंदोलन करतो, त्याला त्या आंदोलनाचा उपयोग व्हायला हवा. ज्यांच्यासाठी आंदोलन, सभा करता त्यांच्या वस्तीत, त्यांच्या घरात, त्यांच्या जीवनात त्या आंदोलनामुळे सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे.” पुढे ते म्हणाले की, ”मी जिथे कुठे असतो, तिथे हे पहिल्यांदा पाहतो की, माझ्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना, बालकांना आणि उपेक्षित घटकांना वाटले पाहिजे की, नरेंद्र आहे ना मग झाले तर माझे कुणी तरी आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे विधान सामाजिक, राजकीयच नव्हे, तर कौटुंबिक स्तरावरील प्रत्येक व्यक्तीसाठी जगण्याचा मंत्रच आहे. सामर्थ्यशाली भारतीय इतिहास लिहिताना ‘नरेंद्र मोदी’ या नावाच्या वळणावर थांबावेच लागेल. त्या अनुषंगाने आपण सगळे भाग्यवान आहोत की, नरेंद्र मोदी नावाची कर्तृत्व आख्यायिका धर्मकर्म करीत असताना, त्या युगात आपणही आहोत.

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.