‘जी २०’ परिषदेतील भारताच्या द्विपक्षीय चर्चा

    16-Sep-2023
Total Views |
Article On G20 Summit Held In Bharat At New Delhi

‘न भूतो, न भविष्यती’ असेच नुकत्याच नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या दिमाखदार ‘जी २०’ शिखर परिषदेचे वर्णन करावे लागेल. केवळ भारताचेच नाही, तर अख्ख्या जगाचे लक्ष या शिखर परिषदेकडे होते. ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताने सर्वार्थाने सार्थकी लावले. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या नीती-संस्कारांतर्गत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा संदेश भारताने दिला आणि त्यादृष्टीने ‘जी २०’ची यशस्वी वाटचालही करुन दाखवली. त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धासारख्या वैश्विक प्रश्नावर नवी दिल्ली घोषणापत्रातही सर्व देशांनी सहमती दर्शविली. त्याचबरोबर इंडिया-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडोर, ग्लोबल बायोफ्यूल अलायन्स, आफ्रिकन युनियनचा ‘जी २०’ मध्ये समावेश यांसारख्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची मुहूर्तमेढही उल्लेखनीय ठरावी. तसेच ‘भारत मंडपम’मध्ये भारत मंडपम’मध्ये पावलोपावली उमटलेले प्रतिबिंब हे या परिषदेचा कळसअध्याय रचणारे ठरले. परंतु, दुर्देवाने संकुचित मानसिकतेच्या विरोधकांनी ‘जी २०’मुळे भारताला काय मिळाले, असा खुजा प्रश्न उपस्थित केला. त्यानिमित्ताने खरोखरीच ‘जी २०’ने भारताला, भारतीयांना आणि जगालाही किती भरभरुन दिले, त्याच्या फलश्रुतीचा आढावा घेणारा हा लेख...

१. भारत-अमेरिका

- विश्वास आणि परस्पर सामंजस्यावर आधारित आपल्या बहुआयामी जागतिक कार्यसूचीच्या सर्व आयामांमध्ये भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीत परिवर्तन घडवण्याचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले.

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा होण्यासाठी आणि त्यात भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे, यासाठी पुन्हा आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला

- भारत-अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कार्यकारी गटांतर्गत व्यावसायिक अंतराळ सहकार्यासाठी कार्यगट स्थापन होणार.

- मोदी आणि बायडन यांनी लवचिक जागतिक ‘सेमीकंडक्टर’ पुरवठा साखळी तयार करण्यासाठी आपल्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. भारतात संशोधन, विकास आणि अभियांत्रिकी कार्याचा विस्तार करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये भारतात ४०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स गुंतवणूक करण्याची ‘अ‍ॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाईस’ची घोषणा.

- ‘६ जी’ सहकार्य सामंजस्य करार.

- क्वांटम क्षेत्रात, भारतासोबत एकत्र काम करण्याच्या वचनबद्धतेचा अमेरिकेने पुनरुच्चार केला आहे.

- भारतातील ग्रीनफिल्ड नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी साठवणूक आणि उदयोन्मुख हरित तंत्रज्ञान प्रकल्पांच्या वापराला गती देण्यासाठी गुंतवणूक मंच स्थापन होणार.

- कर्करोग संशोधन, प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनातील आपल्या वाढत्या द्विपक्षीय सहकार्याचे स्वागत केले.

२. भारत-फ्रान्स

- प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठीचा सहयोग अधिक विस्तारण्याच्या गरजेवर भर दिला.

- आजच्या अस्थिर परिस्थितीत, जगाची घडी पुन्हा एकदा सुव्यवस्थित करण्यासाठी, जागतिक कल्याणासाठीची शक्ती म्हणून, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ हा संदेश घेऊन, एकत्रित काम करण्याच्या अतूट वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

- संरक्षण, अवकाश, अणुऊर्जा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, महत्त्वाचे तंत्रज्ञान, हवामान बदल, शिक्षण आणि लोकसंपर्क अशा नव्या आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी पुढचे पाऊल टाकण्यावर चर्चा केली.

- पायाभूत सुविधा, दळणवळण, ऊर्जा, जैवविविधता, शाश्वतता आणि औद्योगिक प्रकल्प, अशा विषयांवर चर्चा झाली.

- दोन्ही नेत्यांनी, हिंद-प्रशांत प्रदेशात परस्पर सहकार्याद्वारे, भारत-फ्रान्सने एकत्रित सुरू केलेले आंतरराष्ट्रीय सौर सहकार्यविषयक आराखड्यातील सहयोग आणि आपत्तीत टिकून राहू शकतील, अशा पायाभूत सुविधा उभारण्यातील सहकार्य, यासाठी आपली भूमिका अधोरेखित केली.

- दोन्ही नेत्यांनी, रचना, विकास, चाचणी आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि त्यासाठीचे माध्यम यामधील भागीदारीद्वारे संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि हिंद-प्रशांत क्षेत्र आणि त्या व्यतिरिक्त तिसर्‍या देशांसह भारतात उत्पादन वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

३. भारत-जर्मनी

- ‘जी २०’च्या यशस्वी अध्यक्षीय कारकिर्दीबद्दल जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जर्मनीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसेच ‘जी २०’च्या विविध उच्चस्तरीय बैठका आणि कार्यक्रमांमधे सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

- दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय राजनैतिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. संरक्षण, हरित तसेच शाश्वत विकास, महत्त्वाची खनिजे, कुशल मनुष्यबळाची देवाणघेवाण आणि शिक्षण अशा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबद्दल यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली.

- परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी आपली मते मांडली.

४. भारत-इटली

- दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याची दोन्ही नेत्यांनी समाधानाने दखल घेतली.
- भारत-इटली धोरणात्मक भागीदारीच्या विविध क्षेत्रांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संरक्षण आणि नवे आणि उदयाला येणारे तंत्रज्ञान प्रकार यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्य बळकट करण्याबाबत सहमती व्यक्त केली.

- व्यापक जागतिक कल्याणासाठी ‘जी ७’ आणि ‘जी २०‘ यांनी परस्परांशी समन्वय राखून काम करण्याची गरज, त्यांनी विचारात घेतली.

५. भारत-नेदरलॅण्ड्स

- भारताच्या ‘जी २०’ अध्यक्षपदाच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल तसेच शिखर परिषदेच्या आयोजनाबद्दल नेदरलॅण्ड्सचे पंतप्रधान रट्टे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.

- दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. यात व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि हरित हायड्रोजन, ‘सेमीकंडक्टर्स’, ‘सायबर’ आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसह इतर काही विषयांचा परामर्श घेण्यात आला.

- या बैठकीत, परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक विषयांवरही चर्चा झाली.

६. भारत-कॅनडा

- भारत-कॅनडा परस्परसंबंध हे सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या नियमांप्रती आदर आणि दोन्ही देशांमधील जनतेतील मजबूत संबंध यावर आधारित आहेत. हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

- कॅनडातील अतिरेकी घटकांकडून भारतविरोधी कारवाया सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते अलिप्ततावादाला प्रोत्साहन देत आहेत आणि भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध हिंसाचार भडकवत आहेत, दूतावासांच्या परिसराचे नुकसान करीत आहेत.

- कॅनडातील भारतीय समुदायाला आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना धोका पोहोचवत आहेत. संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांचा व्यापार आणि मानवी तस्करीशी अशा शक्तींचे लागेबांधे हा कॅनडासाठीदेखील चिंतेचा विषय आहे, अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

- भारत-कॅनडा संबंधांच्या प्रगतीसाठी परस्परांप्रती आदर आणि विश्वासावर आधारित संबंध आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

७. भारत-बांगलादेश

- सुरक्षा सहकार्य, सीमा व्यवस्थापन, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी, जलसंपदा, ऊर्जा आणि विकास सहकार्य, सांस्कृतिक आणि लोक-जनतेतील संबंधांसह द्विपक्षीय सहकार्याच्या संपूर्ण विस्तारावर दोन्ही देशांनी चर्चा केली. राज्यातील सद्यःस्थिती आणि बहुपक्षीय व्यासपीठावरील सहकार्यावरही चर्चा झाली.

- ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ आणि ‘बांगलादेश बँक’ यांच्यात ‘डिजिटल पेमेंट’ व्यवस्थेतील सहकार्याबाबत सामंजस्य करार २०२३-२०२५ साठी भारत आणि बांगलादेशदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या नूतनीकरणाबाबत सामंजस्य करार, ‘भारतीय कृषी संशोधन परिषद‘ आणि ‘बांगलादेश कृषी संशोधन परिषद’ यांच्यात सामंजस्य करार.

- आगरतळा-अखौरा रेल्वे लिंक : मैत्री वीज संयंत्राचे युनिट-२, खुलना-मोंगला रेल्वे लिंक या प्रकल्पांचे संयुक्त उद्घाटन होणार.

८. भारत-मॉरिशस

- भारत आणि मॉरिशस यांच्यातील राजकीय संबंधांना यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच, ‘जी २०’ शिखर परिषदेच्या विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे, याबद्दल दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी या नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील बहुआयामी द्विपक्षीय संबंधांचा आढावादेखील घेतला.

- दोन्ही देशांदरम्यान ३० हून अधिक शिष्टमंडळ स्तरीय दौरे आणि २३ द्विपक्षीय करारांवर झालेल्या स्वाक्षर्‍या यांसह गेल्या वर्षभरात भारत आणि मॉरिशस यांच्यातील द्विपक्षीय घडामोडी आणखी वेगवान झाल्या आहेत, याची नोंद या नेत्यांनी घेतली.

९. भारत-तुर्किये

- व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, नागरी विमान वाहतूक आणि नौवहन यांसारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या संभाव्यतेबाबत मोदी आणि एर्दोगान यांनी चर्चा केली.

- राष्ट्रपती एर्दोगन यांनी भारताच्या ‘जी २०’ अध्यक्षपदासाठी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये तुर्कीये येथे झालेल्या भूकंपानंतर ’ऑपरेशन दोस्त’अंतर्गत तातडीने मदत पुरवल्याबद्दल, त्यांनी भारताचे आभार मानले.

१०. भारत-ब्राझील

- भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करण्याप्रती तसेच जागतिक घडामोडींमध्ये आपापली विशिष्ट भूमिका टिकवून ठेवण्याप्रती दोन्ही नेत्यांनी त्यांची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.

- स्थायी तसेच अस्थायी अशा दोन्ही श्रेणींमधील विस्तारासह सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणा घडवून आणण्याप्रती दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

- ‘युएन सुरक्षा परिषदे’तील सुधारणेच्या बाबतीत कोणतीही ठोस प्रगती न झालेल्या आंतर-सरकारी वाटाघाटींच्या ओघात निर्माण झालेल्या लकव्याबद्दल दोन्ही नेत्यांनी निराशा व्यक्त केली.

- भारत आणि ब्राझीलदरम्यान वाढलेल्या संरक्षण विषयक सहकार्याचेसुद्धा स्वागत केले. या संरक्षण सहकार्यात, संयुक्त लष्करी कवायती, उच्चस्तरीय संरक्षणविषयक प्रतिनिधी मंडळांची देवाणघेवाण आणि एकमेकांच्या संरक्षणविषयक प्रदर्शनांमध्ये एकमेकांच्या उद्योगांचा सहभाग-समावेश आहे.

११. भारत-कोमोरोस

- ‘जी २०’मध्ये सामील झाल्याबद्दल ‘आफ्रिकन संघ’ आणि कोमोरोसच्या पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज पोहोचवण्यासाठी भारताकडून केले जात असलेले प्रयत्न अधोरेखित केले.

- दोन्ही नेत्यांना त्यांच्या द्विपक्षीय भागीदारीबाबत चर्चा करण्याचीही संधी मिळाली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या अनेक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले आणि सागरी सुरक्षा, क्षमता निर्मिती आणि विकास भागीदारी यांसारख्या क्षेत्रातील सहकार्याच्या संधींवर चर्चा केली.

१२. भारत-दक्षिण कोरिया

- दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाल्याची नोंद दोन्ही नेत्यांनी घेतली.

- त्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण उत्पादन, ‘सेमीकंडक्टर’ आणि ‘ईव्ही बॅटरी’ तंत्रज्ञान यांच्यासह विशेष द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीच्या विविध क्षेत्रांमधील प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली.

१३. भारत-नायजेरिया

- भारताची ‘जी २०’ अध्यक्षता यशस्वी झाल्याबद्दल राष्ट्रपती टीनुबु यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. ‘आफ्रिकी महासंघा’ला ‘जी २०’ समूहाचे स्थायी सदस्यत्व मिळेल, याची सुनिश्चिती केल्याबद्दल तसेच ‘ग्लोबल साऊथ’ देशाच्या हितांना या मंचावर अधिक प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभारदेखील मानले.

- व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण,कृषी, भरड धान्ये, आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान तसेच क्षमता निर्मिती यांसह द्विपक्षीय सहकार्यविषयक विस्तृत घटकांवर दोन्ही नेत्यांनी फलदायी चर्चा केली.

संकलन : पार्थ कपोले, श्रेयश खरात


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.