नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी विशेष अभेद्य तयारी करण्यात येत आहे. मंदिराच्या सुरक्षेची जबाबजारी केंद्रीय राखीव पोलिस दलाऐवजी (सीआरपीएफ) उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दलाकडे (युपीएसएसएफ) सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री रामजन्मभूमी येथे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. जानेवारीत रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार असून, या जीवन अभिषेक सोहळ्याची दिव्य आणि भव्य तयारीही जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमी सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी पार पडली. विभागीय आयुक्त गौरव दयाल, अतिरिक्त पोलिस महासंचालक – सुरक्षा एस. प्रताप कुमार, अतिरिक्त पोलिस महासंचालक पियूष मोरदिया, सीआरपीएफ आणि गुप्तचर यंत्रणांचे अधिकारीदेखील बैठकीत उपस्थित होते.
बैठकीनंतर विभागीय आयुक्त गौरव दयाल म्हणाले की, रामजन्मभूमीची सुरक्षा आता युप एसएसएफ हाताळणार आहे. रामजन्मभूमी संकुलात एसएसएफसोबतच पीएसी आणि सिव्हिल पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात येणार आहेत. एसएसएफचे जवान अयोध्येत पोहोचले असून त्यांचे आठवडाभर विशेष प्रशिक्षण सुरू आहे. श्रीरामजन्मभूमी परिसराची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच सुरक्षा व्यवस्थेत एसएसएफला जोडले जात असल्याचे दयाल यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जून २०२० साली युपीएसएसएफची स्थापना केली आहे. वर्षभरात युपीएसएसएफच्या लखनऊ, गोरखपूर, प्रयागराज, मथुरा आणि सहारनपूर अशा सहा तुकड्या तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये सध्या ९ हजार ९१९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील संवेदनशील इमारती, धार्मिक स्थळे आणि औद्योगिक आस्थापनांना उत्तम सुरक्षा प्रदान करणे हा या दलाच्या स्थापनेचा उद्देश आहे. या जवानांना केंद्रीय एजन्सीच्या विशेष कमांडोप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एसएसएफचे स्वतःचे श्वान पथक आणि बॉम्ब निकामी पथक देखील आहे. कायद्याच्या माध्यमातून या दलाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत.