राष्ट्रीय युद्धस्मारक अभ्यासक्रमात सामील

    15-Sep-2023
Total Views |
National Council of Educational Research and Training included in NCERT syllabus

पुढच्या काळातल्या घरोघरच्या बनूंना असा प्रश्न पडू नये आणि त्यांच्या भावांना त्याचं उत्तर देत बसावं लागू नये म्हणून ‘नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ उर्फ ’एनसीईआरटी’ने राष्ट्रीय युद्धस्मारक म्हणजे काय नि ते कसं, कुठे, केव्हा उभारलं गेलं, या सगळ्या गोष्टींचा समावेश इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमातच करून टाकला आहे.

‘बने, बने हे बघ बोरीबंदर रेल्वे स्टेशन.’ बनू नावाची कोकणातल्या कुण्या गांवढ्या गावातली मुलगी प्रथमच मुंबईला आलेली असते. आता कोकणातून येणार म्हणजे ‘कोकण लाईन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या बोटीतून मालवण, वेंगुर्ले, जयगड, मुसाकाजी, रत्नागिरी, दाभोळ अशा कुठल्या तरी बंदरातून मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर उतरणार आणि ‘व्हिक्टोरिया’ नामक टांग्यातून गिरगाव किंवा फार तर दादरमधल्या कुठच्या तरी चाळीत येणार, हे नक्की असायचं. तिथे बनूचा दादा अगोदरच डेरेदाखल झालेला असायचा. पक्का मुंबैकर झाल्यामुळे तो बनीला मुंबै दाखवायला निघतो आणि मग त्यांचा संवाद वरीलप्रमाणे चालतो. रेल्वेबद्दल फक्त ऐकूनच माहिती असलेली बनू विचारते की, ‘रेल्वे स्टेशन म्हणजे काय रे भाऊ?’ मग दादा बनूला तपशीलवार माहिती सांगतो. पर्यायाने लेखक वाचकाला बहीण-भावाच्या संवादातून एखाद्या विषयाची माहिती सांगतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठीतले आद्य विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी बनू आणि तिचा दादा यांच्या संवादातून, असे अनेक विषय मराठी वाचकांसमोर मांडले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोदकार असल्यामुळे अनेकदा या संवादरूप लेखांमधून संबंधित लोकांची जबरदस्त खिल्ली उडवलेली असे. त्याकाळी मध्यमवर्गीय मराठी स्त्रियांमध्ये बनू, ममू, गंगू, गोदू अशीच नावं प्रचलित असल्यामुळे वाचकांना हे संवाद अगदी घरगुती वाटत असत.

पुढच्या काळात ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, द. पां. खांबेटे, दत्तू बांदेकर, पु. ल. देशपांडे ते अगदी परवा दिवंगत झालेल्या शिरीष कणेकरांपर्यंत अनेक विनोदकारांनी या संवादात्मक लेख प्रकाराचा भरपूर वापर करून वाचकांना मनसोक्त हसवलं. माहिती ही दिलीच. पण, सरळसोट माहितीपेक्षा आतली बितंबातमी दिली.आता तशाच शैलीत असं म्हणायला हवं की, बनूचा भाऊ बनूला सांगतो, ‘बने, बने हे बघ युद्धस्मारक’ आणि गोड-गोड गोष्टी वाचत अहिंसक वगैरे वातावरणात वाढलेली बनू त्याला विचारतेय की, ‘युद्धस्मारक म्हणजे काय रे भाऊ?’पुढच्या काळातल्या घरोघरच्या बनूंना असा प्रश्न पडू नये आणि त्यांच्या भावांना त्याचं उत्तर देत बसावं लागू नये म्हणून ‘नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ उर्फ ’एनसीईआरटी’ने राष्ट्रीय युद्धस्मारक म्हणजे काय नि ते कसं, कुठे, केव्हा उभारलं गेलं, या सगळ्या गोष्टींचा समावेश इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमातच करून टाकला आहे.
 
आज जगातल्या प्रत्येक आधुनिक देशांत अनेक ठिकाणी, अशी राष्ट्रीय युद्धस्मारकं उभी केलेली आहेत. ते देश त्या स्मारकांचा अत्यंत आदराने आणि सन्मानाने सांभाळ करतात. ठरावीक दिवशी ठरावीक राजकीय व्यक्ती किंवा सेनापती त्या स्मारकांवर पुष्पचक्र वाहणार म्हणजे वाहणारच. त्यात काडीमात्र फरक होणार नाही. झाला तर जनता ते अजिबात खपवून घेत नाही. उदाहरणार्थ, २०१८ साली फ्रान्सच्या दौर्‍यावर असताना तत्कालीन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेलॉ इथल्या युद्धस्मारकाला भेट देणं टाळलं. पहिल्या महायुद्धात फ्रान्समध्ये उतरलेल्या अमेरिकत सैन्यातले अनेक जवान या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहेत. फ्रान्सच्या दौर्‍यावर येणारा प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष या स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. ट्रम्प तात्यांनी ही भेट रद्द केली. का? तर म्हणे, पाऊस पडतोय, त्यामुळे माझी केशरचना बिघडेल. ट्रम्प यांच्या या आचरटपणामुळे अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या तीनही देशांमधली जनता, त्यातही विशेषतः आजी, माजी सैनिक त्यांच्यावर प्रचंड संतापले. समाजमाध्यमांतून ट्रम्प तात्यांना अशा काही इरसाल सैनिकी शिव्या हासडल्या गेल्या की, त्यांचा एक वेगळा ‘शिवी कोश’ झाला असता.


आपल्याकडेही प्राचीन हिंदू राजवटींमध्ये अशी युद्धस्मारकं उभी करण्याची पद्धत होतीच. उदाहरणार्थ, इसवी सनाच्या पाचव्या शतकात गुप्त सम्राट यशोधर्मा याने मालव प्रदेशात म्हणजे आजच्या मध्य प्रदेशातल्या मंदसारेजवळ सोंधणी इथे एक जयस्तंभ, कीर्तीस्तंभ किंवा लाट उभी केलेली आहे. हूणांचा निर्णायक पराभव केल्याची आठवण म्हणून ही लाट उभारलेली आहे. भारतात इतरत्रही विजयाची स्मृती म्हणून, अशा लाटा उभ्या आहेत.हे झालं प्राचीन काळचं. आधुनिक काळाचं काय? आधुनिक काळ म्हणजे इसवी सनाचं एकोणिसावं शतक, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं, तर त्या कालखंडात भारतात पारतंत्र्याची बेडी घट्ट होत गेली. इसवी सन १८१८ साली म्हणजे १९व्या शतकाच्या प्रारंभीच इंग्रजी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने मराठ्यांचा निर्णायक पराभव करून संपूर्ण भारताचं वसाहतीत रुपांतर केलं. १८५८ साली ‘ईस्ट इंडिया कंपनी’चं बाहुलं बाजूला सारून ब्रिटिश पार्लमेंटने राणी व्हिक्टोरियाच्या नावाने भारताला आपल्या साम्राज्यात दाखल करून टाकलं. पारतंत्र्याच्या त्या भीषण कालखंडात कोण नि कसली युद्धस्मारकं उभारणार?
 
अशात विसावं शतक उजाडलं आणि त्याच्या पूर्वार्धातच म्हणजे १९१४ ते १९१८ या कालखंडात ब्रिटिश साम्राज्यासकट सगळं जगच महायुद्धाच्या भीषण, संग्रामात सापडलं. भारतही अपरिहार्यपणे यात ओढला गेला. किमान पाऊण एक लाख भारतीय सैनिक युरोप आणि मध्य पूर्वेतल्या रणांगणांवर पतन पावले. खरं पाहता, हे भारतीय गुलाम होते आणि आपल्या ब्रिटिश धन्यांच्या हितासाठी, ज्या युद्धाचा त्यांच्या देशाशी काडीचा संबंध नव्हता, अशा युद्धात ते फुकट मेले होते. पण, त्यांनी दाखवलेलं शौर्य, क्षात्रतेज इतकं अपूर्व होतं इतकं दीप्तीमान होतं की, इंग्रजही दिपून गेले. महायुद्ध संपल्यावर लगेचच १९१९ साली इंग्रजांचं अफगाण बंडखोरांशी एक युद्ध झालं, त्यातही भारतीय सैनिकांनी प्रचंड मर्दुमकी गाजवली. त्यामुळे इंग्रज सरकारनेच १९२१ साली राजधानी दिल्लीत या सैनिकांच्या स्मरणार्थ एक भव्य कमान उभारली आणि तिला नाव दिलं ’इंडिया गेट.’ त्या पाठोपाठ १९२२ साली दिल्लीतच ’तीन मूर्ती’ या नावाचं एक युद्धस्मारक उभं राहिले.


महायुद्धात पॅलेस्टाईन प्रदेशातल्या (आता इस्रायलमध्ये) हैफा भागात फारच लढाया झाल्या होत्या. यात इंग्रजांना जोधपूर, म्हैसुर आणि हैदराबाद या संस्थानांच्या सैन्याची फार मदत झाली होती. म्हणून या तीन संस्थानांचे गणवेश धारण केलेले तीन सैनिक आणि त्यांच्यामध्ये जयस्तंभ, असं या स्मारकाचं रूप होतं. यावरून त्याला नाव पडलं ’तीन मूर्ती चौक’ आता हे सगळं झालं पारतंत्र्याच्या काळात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमच्या नव्या राज्यकर्त्यांना सैन्य, सैनिक, युद्ध, शस्त्रात्रं इत्यादी संकल्पनासुद्धा नकोशा वाटत होत्या. पण, ऑक्टोबर १९४७ आणि ऑक्टोबर १९६२ मध्ये अनुक्रमे पाकिस्तान आणि चीन हे शत्रू मुळी अंगावरच येऊन पडले. नाईलाजाने अहिंसा, शांती वगैरे भ्रम बाजूला ठेवून युद्धाला उभं राहवंच लागलं. पण, पहिलं युद्ध अनिर्णित राहिलं आणि दुसर्‍या युद्धात केविलवाणा पराभव झाला. कसला उभारणार जयस्तंभ?
 
पुन्हा सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तान अंगावर कोसळला. या युद्धात मात्र कणखर नेतृत्वामुळे देदीप्यमान यश मिळालं. पण, कोणतंही स्फूर्तिदायी स्मारक उमारण्यापूर्वीच तो कणखर नेता काळाने ओढून नेला. नंतरच्या नेतृत्वाला पुन्हा युद्ध वगैरे विषयांचं वावडं होतं. पण, १९७१ साली याच नेतृत्वाला बांगलादेशसाठी युद्धात पडावचं लागलं. दि. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर असं अवघं १३ दिवसांचं ते युद्ध भारतीय सैन्याच्या भीमपराक्रमाने जिंकलं गेलं. अवघ्या देशाचं क्षात्रतेज उसळून उठलं. आता काहीतरी करायलाच हवं. जनतेच्या आणि सैनिकी दलांच्या समाधानासाठी घाईघाईने ‘इंडिया गेट’च्या कमानीसमोर एक छोटीशी मंडपी उभारण्यात आली. एक उलटी रायफल, तिच्यावर एक सैनिकी हेल्मेट आणि समोर एक अखंड तेवणारी ज्योत (नैसर्गिक वायूच्या साहाय्याने) असं स्मारक बनवून त्याला ’अमर जवान ज्योती’ असं नाव देऊन दि. २६ जानेवारी १९७२ला याचं उद्घाटन झालंसुद्धा.
 
तेव्हापासून २०१२ पर्यंत तीनही सेनादलांकडून पुनःपुन्हा भव्य युद्धस्मारकाचा आग्रह होऊनसुद्धा काहीही झाले नाही. असं का? कारण, युद्धस्मारक पाहिल्यावर नागरिकांची मनं, हृदयं कृतज्ञतेने ओथंबून येणार. त्याचबरोबर या वीर बलिदानींच्या आठवणींनी लोकांची मनगट शिवशिवणार, बाहू स्फूरण पावणार, क्षात्रतेज उसळणार, आपणही असाच पराक्रम गाजवून भारताच्या शत्रूंचा उच्छेद करावा, अशी भावना त्यांच्या अंतःकरणात उदय पावणार. तेव्हा नकोच ते. भारताचे शत्रू म्हणजे ती का माणसं नाहीत? त्यांना का मन नाहीत? यांना का घरंदार मुलबाळ नाहीत? त्यांचा उच्छेद झाल्यास त्या बिचार्‍या कुटुंबीयांनी कोठे बरे जावे? तेव्हा नकोच ती युद्धस्मारकाची भानगड. अगदी फारच आग्रह झाला. तेव्हा २०१२ साली तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी ‘इंडिया गेट’ परिसरातच भव्य युद्धस्मारक होईल, अशी घोषणा केली. लगोलग त्यांच्याच पक्षाच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असलेल्या बाईंनी युद्धस्मारक योजनेला ठाम विरोध केला.
 
 
देशाच्या सैनिकी दलांची आणि जनतेच्या भावनांची क्रूर टिंगल करणारा हा पोरखेळ २०१४च्या सत्तांतरानंतर बंद पडला. (नॅशनल वॉर मेमोरियल)राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि (नॅशनल वॉर म्युझियम)राष्ट्रीय युद्ध संग्रहालय, असे दोन वेगळे प्रकल्प बनवण्यात आले. त्यासाठी रितसर निविदा मागवण्यात आल्या. चेन्नईमधल्या ’वी. बी. डिझाईन लॅब’च्या योगेश चंद्रहासन् या शिल्पशास्त्रतज्ज्ञाने सर्वोत्कृष्ट आराखडा सादर केला. इंडिया गेट आणि त्याच्या समोरील अमर जवान ज्योती यांच्याच पुढे कर्तव्यपथावर (जुन नाव राजपथ) ४० एकरच्या भूखंडावर चंद्रहासन्ने उत्कृष्ट युद्धस्मारक उभं केल आहे. याची रचना चक्रव्यूहाच्या नमुन्यावर आहे. पहिले मंडल अमर चक्र, त्याच्याभोवतीचं दुसरे मंडल वीरता चक्र, तिसरं मंडल त्याग चक्र आणि चौथे मंडल रक्षक चक्र, अशी यांची नावं आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजवरच्या विविध युद्धांत ’परमवीर चक्र’ हा सर्वोच्च सन्मान मिळवणार्‍या २१ योद्ध्यांचे अर्धपुतळे उभे करून त्याला ’परम योद्धा स्थल’ असे नाव देण्यात आलं आहे.

दि, ७ ऑक्टोबर २०१५ रोजी नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाने योजना मंजूर केली. झपाट्याने काम सुरू होऊन दि. १ जानेवारी २०१९ रोजी ते पूर्ण झालेसुद्धा. दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याचं अधिकृत उद्घाटन झालं. दि. ३० मे २०१९ रोजी नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी संसद भवनाकडे निघाले. ते प्रथम या स्मारकावर आले. त्यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक या सर्व हुतात्म्यांना अभिवादन केलं. ‘परम् साधनम् नाम वीरव्रतम्’ असं म्हणणारे आणि तसं वागणारे, जगणारे लोक सत्तेवर आले की, दिवस असे बदलतात. दि. १६ डिसेंबर २०२० रोजी भारताच्या बांगलादेश युद्ध विषयाचं ५०वं वर्षं सुरू झालं. त्यानिमित्त पंतप्रधानांनी या स्मारकात ’स्वर्णिम विजय मशाल’ प्रज्ज्वलित केली.

इंडिया गेट परिसरातच आणखी एका मंडपात १९३६ साली ब्रिटनचा किंग जॉर्ज पाचवा याचा भव्य पुतळा बसवण्यात आला होता. १९६८ साली इंग्रजांचे पुतळे हलवण्याच्या मोहिमेअंतर्गत तो तिथून हलवण्यात आला. दि. २३ जानेवारी २०२२ या दिवशी नेताजी सुभाषचंद बोस यांची १२५वी जयंती होती. दि. २१ जानेवारीला पंतप्रधानांनी घोषणा केली की, इंडिया गेटच्या त्या मंडपीत नेताजींचा पुतळा उभारण्यात येईल. यानुसार दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी २६ फूट उंच आणि सहा फूट रूंद असा नेताजींचा भव्य पुतळा तिथे बसवण्यात आला. आता इंडिया गेटच्या उत्तरेला १४ एकर जागेत युद्ध संग्रहालय उभं केलं जात आहे. जुलै २०२० पासून हे काम वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. 
मल्हार कृष्ण गोखले


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.