मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं असलं तरी त्यांचं आंदोलन सुरूच आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र आंदोलन मागे घेणार नाहीत, यावर ते ठाम आहेत. गेल्या १७ दिवसांपासुन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे आंदोलन करत आहेत.
२९ ऑगष्टपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. सरकारने मागितलेल्या एक महिन्याच्या मुदतीनंतर आंदोलक मनोज जरांगे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि सरकारला सरसकट मराठा आरक्षण देण्यासाठी ५ अटी घालत एक महिन्याची मुदत दिली. आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं ही जरांगेंनी म्हटलं आहे.