ठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग मोहिमेत १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जात आहे. इंडियन स्वच्छता लीग या उपक्रमातंर्गत ठाण्यातुन 'ठाणे टायटन्स' मैदानात उतरले आहे. या संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण संघाचे कर्णधार व प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मंगळवारी करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या अभियानात देशातील ३०८५ शहरांचा सहभाग असून महाराष्ट्रातील एकूण ४११ शहरांचा यात समावेश आहे. आपल्या ठाणे शहराची स्वच्छता ही उत्तम असली पाहिजे आणि आपल्या शहराने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली पाहिजे. त्यासाठी इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत आपण स्वत: सहभागी होणार आहे. ठाणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाऊ कदम यांनी केले. या उपक्रमात रविवार, १७ सप्टेंबर रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे इंडियन स्वच्छता लीगच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.