ठाणे युथ लीग मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    15-Sep-2023
Total Views |

football


डोंबिवली : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या ठाणे युथ लीग मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय ज्युनिअर आणि सब ज्युनिअर मुलींच्या महाराष्ट्राच्या संघासाठी काही खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

डोंबिवलीच्या पलावा फुटबॉल ग्राउंडवर १३ , १५ आणि १७ अशा तीन वयोगटात नुकतीच ही स्पर्धा खेळवण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातून मुलींचे १२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. १३,१५ आणि १७ वयोगटातील या मुलींच्या संघांचे तब्बल ३६ सामने खेळवण्यात आले. ज्यामध्ये नवी मुंबईतील जोशूआ फुटबॉल अकादमी, ठाण्यातील ठाणे सीटी एफसी, नवी मुंबईतील रायन इंटरनॅशनल, नवी मुंबई मधील फुटबॉल स्कूल इंडिया, कल्याणमधील सेक्रेड हार्ट फुटबॉल अकादमी, कल्याणातील क्वीन्स युनायटेड फुटबॉल अकादमी, नवी मुंबईतील रोअर फुटबॉल अकादमी आदी संघांचा समावेश होता.

१३ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद रोअर फुटबॉल अकादमीने, १५ वर्षांखालील स्पर्धेचे ठाणे सीटी एफसी आणि १७ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद फुटबॉल स्कूल ऑफ इंडियाच्या संघाने पटकावले.


football


तर बेस्ट गोल किपर म्हणून नेहा घोलप (एफ एस आय, नवी मुंबई) समायरा शर्मा (एफ एस आय, नवी मुंबई) आणि कियारा सराफ (ठाणे सीटी एफ सी) आणि बेस्ट प्लेअर म्हणून झोया खान (जोशूआ फुटबॉल अकादमी), सना पालन (ठाणे सीटी एफसी), श्रावणी सावंतला (रोअर एफसी) गौरवण्यात आले.

या स्पर्धेत उपविजेतेपदावर १३ वर्षांखालील गटातून फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया, १५ वर्षांखालील गटातून फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया आणि १७ वर्षांखालील गटातून रायन इंटरनॅशनल स्कूल यांना समाधान मानावे लागले. ठाणे फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव सुनिल पुजारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळवण्यात आली. यावेळी शिवसेनेचे महेश पाटील, गोल्डन ईगल चे संस्थापक अध्यक्ष सुजित अमीन आदी मान्यवर उपस्थित होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.