नवी दिल्ली : द्रमुक पक्ष गेल्या ७० वर्षांपासून हिंदूविरोधी अजेंडा राबवित असून देशातील सर्वांत जुना पक्ष काँग्रेस त्यास पाठिंबा देत आहे, असा घणाघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.
द्रमुक नेत्यांच्या हिंदू धर्माविरोधातीस वक्तव्यांना भाजपतर्फे जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये द्रमुकसह काँग्रेसवर टिका केली आहे. त्या म्हणाल्या, तामिळनाडूतील जनतेला याचा नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. भाषेच्या अडथळ्यामुळे उर्वरित देशाला लवकर समजत नाही, मात्र गेल्या ७० वर्षांपासून हिंदूविरोधी अजेंडा राबवित आहे. सध्या समाजमाध्यमांचे युग असल्याने द्रमुकचा खरा चेहरा देशासमोर येत असल्याचे त्या म्हणाल्या.
हिंदूविरोधी अजेंडा असलेल्या पक्षास देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष म्हणजेच काँग्रेस त्यास पाठिंबा देत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य म्हणजे संविधानाची थट्टा असून मंत्रिपदाच्या शपथेचे उल्लंघन आहे. त्याचप्रमाणे द्रमुक ह सर्वच विरोधी पक्ष हे जाणीवपूर्वक हिंदूविरोधी राजकारण करत असल्याचेही सीतारामन यांनी नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलांनी सनातन धर्मावरील वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उदयनिधी स्टॅलिन आणि इतरांविरुद्ध एफआयआरची मागणी करण्यासोबतच आता उदयनिधी स्टॅलिन यांना यापुढे कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे निर्देश देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.