विस्मरण नकोच!

    15-Sep-2023
Total Views |
Ganeshotsav tradition
 
शहरातील बसमधून प्रवास करताना पुण्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी ठिकठिकाणी दिसत होती. त्यामुळे सहज एका शाळकरी विद्यार्थ्याला सोबत असलेल्या गृहस्थाने विचारले, “बाळा, गणेशोत्सव कुणी सुरू केला?” त्यावर त्या विद्यार्थ्याने “दगडूशेठ यांनी” असे उत्तर देऊन भ्रमनिरासच केला. यातून आजच्या पिढीला आपण कसे ज्ञान देत आहोत, हा प्रश्न पडणे अगदी साहजिकच. याला पालक, शिक्षक आणि समाजातील प्रबोधन करणारे घटक जबाबदार आहेत, असे म्हटले तर वावगं वाटू नये. आताच्या उदयोन्मुख पिढीला केवळ पुस्तकी शिक्षण देऊन त्याच्या हाती डिग्री सोपविणे एवढे सोपस्कार केले म्हणजे नवी पिढी तयार झाली, हा जो ‘इंस्टंट’ विचार रूढ होत आहे, तोच मुळात घातक आहे. अन्यथा, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षण घेणारा विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे किंवा अन्य इतिहासकालीन महान व्यक्ती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आबासाहेब मुजुमदार किंवा समकालीन विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, पेशवे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा थोर लोकांना विसरू लागला, तर आपल्या इतिहासाची मोडतोड करून आपल्या या भावी पिढीला गुमराह करण्याचे काम करणार्‍यांचे फावेल, यात संदेह नाही. त्या मुलाने दिलेले उत्तर धक्कादायक आहे, बरे झाले प्रवासात अन्य कुणी ते ऐकले नाही. मात्र, माणूस आज स्वतःची रोजीरोटी कमावण्याच्या घाईत इतका मश्गूल झाला की, त्याला आपल्या लेकरा बाळांच्या पोटा-पाण्याच्या चिंतेत त्याची ज्ञानाचीदेखील भूक भागवावी लागते, याचा विसर पडू लागला आहे. ज्या शिक्षकांच्या विश्वासावर हे पालक त्यांना शाळेत धडतात किमान, त्या शिक्षकांनी आणि समाज सुधारण्याचा वसा घेतलेल्यानी निदान, असे विस्मरण भावी पिढीला होता कामा नये, याची दक्षता घ्यावी.तसेच याची जबाबदारी केवळ शैक्षणिक संस्थांची नसून पालकांची भूमिकाही यामध्ये तितकीच महत्त्वाची. पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष शिक्षणावर, छोट्या-मोठ्या फिल्ड व्हिजिट्सवर भर दिला, तर या मुलांना आपले शहर आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्यात नक्कीच मदत होईल.

 
जाणीव हवीच!


अनेक महानगरांमध्ये वाहतूककोंडीच्या समस्येने उग्र रूप धारण केलेले दिसते. झपाट्याने विस्तार होत असलेल्या पुणे या महानगरातदेखील ही समस्या तर अगदी रोजची डोकेदुखी. अमाप वाहनसंख्या, त्यात त्यांचे एकाचवेळी रस्त्यावर धावणे, रस्त्यांची रुंदी, लगतची अतिक्रमणे, पार्किंग आणि अन्य कारणे यांमुळे या समस्येवर तोडगा काढायचा तरी कसा? आणि काढायचा तरी कुणी? हे कळीचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासन मनुष्यबळ कमी असल्याने हतबल आहे, तर लोक आपल्या कामासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी वाहन आवश्यक असल्याने काहीही करू शकत नाही. शहराचे आकारमान, कधीतरी चुकलेले नियोजन यामुळे पार्किंग समस्या उग्ररूप घेत आहे. रस्त्यालगत छोटी-छोटी दुकाने सुरू केल्याने गच्च झालेले काही ठिकाणी आढळून येते, त्यामुळे वाहतूककोंडी सुटण्याऐवजी त्यात अधिक भरच पडत असल्याचे दिसून येते. आता यात दोष कुणाचा? याचे उत्तरदेखील मिळत नाही. प्रत्येक घटक अपापल्याजागी योग्य आहे. प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही. वाहनधारक वाहने घरी ठेवणे अमान्य करतात. दुकाने थाटणारे त्यांच्याजागी योग्य आहेत. त्यामुळे उपाय कोणता आणि काढायचा कसा, हा यक्षप्रश्न कायम राहतो. ही केवळ पुण्याची गत आहे असे नाही. थोड्या बहुत प्रमाणात अन्य नागरी भागातदेखील वाहतूककोंडीचे हेच चित्र आणि त्याची कारणेही साधारण अशीच. मात्र, पुण्यातील एका रिक्षाचालक संघटनेने काळजावर दगड ठेवून एक धाडस केले. चक्क वाहतूककोंडी विरोधात निदर्शने करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. नव्या रिक्षांना परवाना देऊ नका, असे म्हणण्याचे धाडस त्यांनी दाखविले. उलट आपल्या व्यवसायाची भरभराट होऊ नये, असे कुणालाच वाटत नसते. मात्र, वाहतूककोंडीने निर्माण होणार्‍या समस्येची उकल करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांना ही जाणीव झाली, हीच फार मोठी गोष्ट. याहीपेक्षा विशेष बाब अशी की, ’आम्हीच जबाबदार आहोत पुण्याच्या ट्रॅफिक जाम’ला, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यासदेखील त्यांनी पुढाकार घेतला. यातून त्यांना जाणीव झाली हे महत्त्वाचे. त्यामुळे नागरिकांनीदेखील यातून बोध घेऊन अत्यंत तातडीची गरज असेल तेव्हाच वाहन घराबाहेर आणावे, अन्यथा आपली कामे वाहनाशिवाय उरकण्याची सवय लावून घेतली, सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला तर वरील काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील. मथितार्थ काय जाणीव हवीच.

  - अतुल तांदळीकर


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.