मुंबई : बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात झाला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी नाना पाटेकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि त्यांना या चित्रपटासाठी कसे कास्ट करण्यात आले याचा रंजक किस्सा विवेक अग्निहोत्री यांनी सांगितला.
याविषयी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, “अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला कित्येकांनी सांगितलं की इतर कुणालाही घ्या पण नानांना या चित्रपटात घेऊ नका. कारण जरा जरी त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर तुझी काही खैर नाही असं बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं. मी पल्लवीकडे याबाबतीत विचारणा केली तेव्हा मला समजलं की कामाच्या बाबतीत नाना इतका चोख कलाकार नाही.”
पुढे ते म्हणाले, “नाना पुण्याच्या पुढे खडकवासलाजवळच्या एका फार्म हाऊसमध्ये राहतात, मी तिथे गेलो, नाना यांनी आमच्यासाठी छान जेवण केलं होतं. त्यानंतर मी न राहवून नाना यांना विचारलं की तुम्ही मला ४-५ वेळा थोबडावून काढलं तरी चालेल पण मी जी भूमिका लिहिली आहे ती तुम्ही अगदी तशीच साकारणार ना, एवढंच मला जाणून घ्यायचं आहे. एक गोष्ट मी अभिमानाने सांगू इच्छितो की सेटवर नाना एक नवीन मुलाप्रमाणे वावरत होते. या भूमिकेसाठी नाना यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं पडद्यावर दिसून येत आहे.”
‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट देशभरात २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.