रसिका शिंदे-पॉल
मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात करोना महामारीपासून देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन लस तयार केली. असमान्य परिस्थितीतही डॉ. भार्गवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन लस कशी तयार केली याची रंजक आणि थरारक कथा द वॅक्सिन वॉर या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री गिरीजा ओक हिने देखील एक महत्वपुर्ण भूमिका साकारली आहे. काही कलाकारांना पुढे-पुढे करण्याची सवय असते असं गिरीजाच्या बोलण्यावरुन वाटलं असं म्हणत पल्लवीने गिरीजाचा एक भन्नाट किस्सा सांगितला.
गिरीजा ओकचा ‘तो’ किस्सा
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिकची लाट आली आहे. आणि ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट देखील लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचाच बायोपिक आहे. त्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा हुबेहुब किंवा त्यांच्या जवळपास जाणारे कलाकारच शोधण्याचे दिव्य समोर होते. मात्र, सर्व महिला शास्त्रज्ञांची उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री लाभल्या याचा आनंद असल्याचे पल्लवी म्हणाली. या चित्रपटात अभिनेत्री गिरीजा ओक हिने देखील एका महिला शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. गिरीजाबद्दलची एक महत्वाची बाब पल्लवीने यावेली सांगितली. “ज्यादिवशी चित्रपटाच्या संहितेचे वाचन सुरु होते, त्यादिवशी गिरीजा आमच्या उच्चारांमधील चुका काढत होती आणि आम्हाला ते शब्द कसे उच्चारावे हे सांगत होती. आधी आम्हाला वाटलं की काही अभिनेत्री किंवा कलाकारांना फार पुढे-पुढे करण्याची वाईट सवय असते तसं गिरीजा करत नाही आहे ना? परंतु, आम्हाला संभ्रमात पाहिल्यानंतर गिरीजा म्हणाली की मी बायो-सायन्सची विद्यार्थीनी असून मी या विषयाचा अभ्यास केला आहे. आणि हे ऐकल्यानंतर आमच्या मनातील शंका दुर झाली आणि चित्रपटाचे संपुर्ण चित्रिकरण पुर्ण होईपर्यंत आम्ही सर्व कलाकार गिरीजाकडे जाऊन आम्ही उच्चारत असणारे शब्द योग्य आहेत ना याची पडताळणी करत त्यांचे अर्थ देखील समजून घेत होतो”. तसेच, शास्त्रज्ञ आणि लस या विषयावर चित्रपट असून त्यातील बरेच शब्द किंवा वाक्यप्रचार हे विज्ञानाशी निगडित असून ते सामान्यांना समजतील इतक्या सोप्प्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही पल्लवीने स्पष्ट केले.
‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारताची पहिली स्वतःची लस बनवणाऱ्या असामान्य शास्त्रज्ञांची ही कथा २८ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.