पुण्यात रा.स्व.संघाच्या समन्वय बैठकीला प्रारंभ

    14-Sep-2023
Total Views |

RSS Samanvay Baithak
(RSS Samanvay Baithak Pune)
मुंबई : पुण्यात एस.पी.कॉलेज येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पार्चन करून बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीत एकूण ३६ संघटनांचे प्रमुख २६७ पदाधिकारी सहभागी झाले आहेत. त्याबरोबरच ३० भगिनीही या बैठकीस उपस्थित आहेत.
 
   सलग तीन दिवस होत असलेल्या या बैठकीत राष्ट्रीय व सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अन्य काही मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यासोबतच सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा होईल. संघटनेचा विस्तार आणि विशेष उपक्रमांच्या माहितीचेही आदानप्रदान बैठकीदरम्यान करण्यात येईल.


RSS Samanvay Baithak 1
 
   या बैठकीला प्रामुख्याने रा.स्व.संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी, सहसरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य, सहसरकार्यवाह अरूण कुमारजी, सहसरकार्यवाह मुकुंदाजी आणि सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधरजी यांच्यासह अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्यांमध्ये भैय्याजी जोशी, सुरेशजी सोनी, व्ही. भागैय्याजी उपस्थित आहेत. तसेच राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का, प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीताक्का, महिला समन्वयच्या वतीने चन्दाताई, स्त्री शक्तीच्या अध्यक्षा शैलजा, राष्ट्रीय सेवा भारतीच्या महामंत्री रेणु पाठक, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचन्द्र खराड़ी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष राजशरण शाही, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, विद्या भारतीचे अध्यक्ष रामकृष्ण राव, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकान्त चतुर्वेदी (निवृत्त), भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्मय पंड्या, संस्कृत भारतीचे संघटन मंत्री दिनेश कामत यांचीसुद्धा या बैठकीला उपस्थिती आहे. शनिवार, दि १६ सप्टेंबर रोजी बैठकीचा समारोप होईल.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.