सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही: नारायण राणे

14 Sep 2023 16:58:54
 

Narayan Rane
 
 
मुंबई : नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर आपला भुमिका स्पष्ट केली. सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलं आहे. घटनेने तरतूद केल्याप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. ज्याला इतिहासाची जाण आहे त्यानेच या विषयावर बोलावं. यापूर्वी जी आरक्षण देण्यात आली तेव्हा मराठेच मुख्यमंत्री होते. मराठा आरक्षण देताना द्वेषाची भावना असू नये. असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण समाप्त केले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे पाटील यांची होती. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारने महिन्याभराचा कालावधी दिला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय पूर्वीही झाला होता. अनेकांनी आरक्षणाबाबत टीकाही केली. राज्य सरकारने घटनेतील 15/4 चा अभ्यास करावा. सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. राज्यात 38 टक्के मराठा समाज आहे जो गरीब आहेत, त्यांना आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजातील वर्गाला आरक्षण द्यावे पण कुणाचेही आरक्षण काढून हे आरक्षण देऊ नये." असंही राणे यावेळी म्हणाले.
 
उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरु आहे. यावर प्रहार करताना राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच दिवस देखील मंत्रालयात आले नाही आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत. दिल्लीत वातवरण दिवाळीसारखं होते. सर्व लोक आनंदित उत्साहात होते. सर्व मोदींचे कौतुक करत होते. 60 शहरात 200 बैठका घेतल्या. भारताचे नावलौकिक संपूर्ण जगात त्यांनी वाढवलं. चांगल्याला चांगलं म्हणावं ही संस्कृती आहे. पण आमच्या विरोधकानी चांगलं म्हटले नाही." अशी टीकाही राणेंनी विरोधकांवर केली.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0