ठाणे : मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश... देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित अमृत कलश यात्रेचा प्रारंभ गुरुवारी ठाण्यात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. विविध प्रभागसमिती क्षेत्रात मार्गक्रमण करीत या अमृतकलशामध्ये नागरीकांकडुन माती किंवा तांदूळ गोळा करण्यात येणार आहेत.
नौपाडा प्रभागात पंचप्राण शपथ घेऊन बँडबाजाच्या साथीने निघालेल्या अमृत कलश यात्रेत घराघरातून माती व तांदूळ जमा करण्यात आले, या यात्रेत ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, टीडीआरएफ जवान, सुरक्षारक्षक तसेच स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा अमृतकलश ३० सप्टेंबरपर्यत ठाणे शहरात फिरणार असुन या कलशामध्ये जमा झालेली माती व तांदूळ २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे पाठविण्यात येणार आहे. तद्नंतर, राज्य शासनामार्फत हा अमृतकलश नवी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे उभारण्यात येणाऱ्या अमृतवाटिकेमध्ये मिसळण्यात येणार आहे.