मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून या सुनावणीनंतर अपात्रता प्रकरणावर नेमका काय निकाल येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अशातच आता ठाकरे गटाकडून असीम सरोदे हे युक्तीवाद करत आहेत. कोणते आमदार अपात्र होणार याचा फैसला विधानसभा अध्यक्षांच्या हाती असेल. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
दरम्यान आमदार अपात्रताप्रकरणी निर्णय घेण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. त्यानुसार ही सुनावणी आजपासून सुरू होत आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि अॅडव्होकेट असीम सरोदे हे युक्तीवाद करणार आहेत. शिंदे गटाने लेखी उत्तर 6000 पानांचं दिलंय. बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर आणि नरेंद्र बोंडेकर या अपक्ष आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे दूरगामी राजकीय परिणाम होणार असल्यानं नार्वेकरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
कोण आहेत असीम सरोदे?
अॅड. असीम सरोदे हे गुन्हेगारी, कौटुंबिक, आंतरराष्ट्रीय, पर्यावरण आणि मानवी हक्क कायद्यांचे तज्ञ आहेत. कॉलेजमध्ये असताना, असीम सरोदेंनी दलित आणि उपेक्षित वर्गांना कायदेशीर मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत देण्याचा विचार सुरू केला, म्हणून त्याने सामाजिक-कायदेशीर कारणांसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला.