मुंबई : राज्यातील तरुणांना कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) ‘पीएम स्कील रन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांना सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येईल. पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधता येईल. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कौशल्य विकास विभाग कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असल्याचे मंत्री लोढा म्हणाले.
आयटीआयच्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी केले आहे.