बैलपोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन...

14 Sep 2023 21:00:19
Bailpola Festival In Maharashtra Nashik Road

“माझा घालावाया शीण तेव्हा चारलास गूळ, कधी घातलीस झूल कधी घातलीस माळ, अशा गोड आठवणीत्यांचे करीत रवंथ, मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत” या कवितेच्या ओळी बैलपोळा सणाची आठवण करून देतात. नाशिकमधील सागर शाम खर्जुल, राहणार खर्जुल मळा, नाशिकरोड यांच्याकडेदेखील तीन खिल्लारी जातीचे सर्जा, राजा आणि गरुडा चार ते पाच वर्षांचे बैल आहे.

त्यातील सर्जा आणि राजा हे बैल शेतकामासाठी असून, गरुडा बैलशर्यतीसाठी आहे. सागर खर्जुल सांगतात की, “बैलपोळा सण हा त्यांच्यासाठी सगळ्या सणांपैकी जिव्हाळ्याचा सण आहे. तसेच, आजच्या पिढीने आवर्जून पोळा साजरा करायला हवा. जेवेकरून येणार्‍या पिढीलादेखील बैलांविषयी आस्था टिकून राहील.“ पोळा सणानिमित्त खर्जुल यांनी आपल्या लाडक्या बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकून त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा व पायात करदोड्याचे तोडे घालून गोड पुरणपोळी, ठोंबरा, कढी, भजे असा पंचपक्वान्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला.

त्यानंतर सायंकाळी गावकर्‍यांसमवेत पारंपरिक वाजंत्री, सनई, ढोल, ताशे यांसह देवळाली गावातील खर्जुल यांच्या ग्रामदैवत, हनुमान मंदिर आणि म्हसोबा मंदिरावरून फेर्‍या मारत गावातून मिरवणूक काढली. यावेळी पंकज (बंटी) खर्जुल, संतोष खर्जुल, दीपक खर्जुल, किरण खर्जुल, योगेश खर्जुल, निखिल खर्जुल, जयश्री खर्जुल, राहुल खर्जुल, विशाल खर्जुल, समाधान खर्जुल, गोरख तात्या खर्जुल, नितीन भाऊ खर्जुल, नगरसेवक व समस्त खर्जुल परिवार उपस्थित होता.

Powered By Sangraha 9.0