मुंबई : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची अखेर सुनावणी पार पडली असून झालेल्या या पहिल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचे आमदार स्वतः हजर होते. यावेळी शिवसेना आमदारांनी केलेल्या मागणीनंतर आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांना कागदपत्र सादर करण्यासाठी आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी अवधी मिळाला आहे.
दि. १४ सप्टेंबर रोजी शिवसेना आणि उबाठा गटाच्या आमदार अपात्रतेच्य सुनावणीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आली. शिवसेना उबाठा गटाच्या वतीने देवदत्त कामत आणि असिम सरोदे यांनी बाजू युक्तीवाद केला. तर शिवसेनेकडून अनिल सिंग आणि निहार ठाकरे यांनी बाजू मांडली.
यावेळी उबाठा आमदार सुनिल प्रभू यांच्याकडील कागदपत्रे मिळाली नसल्याचे शिवसेना आमदारांनी नमूद केले. शिवसेनेने नोंदवलेल्या या मुद्द्यामुळे शिवसेना आमदारांना अतिरिक्त दोन आठवड्यांची मुदतवाढही देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती.
ही मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आजपासून दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. गणेशोत्सव तोंडावर असल्याने ही मुदत देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण ३४ याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. मात्र गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत केवळ एकाच याचिकेवर सुनावणी पुर्ण झाली. दरम्यान, शिवसेना आमदारांना देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ ऑक्टोंबरला होणार आहे.