मुंबई: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून या सुनावणीनंतर अपात्रता प्रकरणावर नेमका काय निकाल येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा वाजल्यापासून सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पक्षांतराची कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उबाठा गटाकडून करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निर्वाळाही निवडणूक आयोगाने दिला होता. यावरच आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार असून अपात्रतेच्या संदर्भात काही दिवसांत निकाल येण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नार्वेकर यांच्याकडेच अबाधित असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षच आता आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेतील हे स्पष्ट आहे. या सुनावणीत दोन्ही गटाच्या आमदारांना आपल्या बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भात एकूण ३४ याचिका दाखल झाल्या असून या सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे.