उल्हासनगर : विना परवानगी गणेश मूर्तीच्या आगमनाची मिरवणूक काढून तब्बल सहा तास वाहतुकीस अडथळा आणून प्रचंड ढोल ताशांच्या आवाजात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या " राजा उल्हासनगरचा" या शहरातील मोठ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर -१ येथील सोनारा हॉलजवळ शहरातील राजा उल्हासनगरचा या गणेश मंडळाचा गणपती बसविण्यात येतो, यंदाही १२ सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने मूर्ती आणण्यात आली होती दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेले गोल मैदान, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे संपर्क कार्यालय, डी . टी कलानी महाविद्यालय, सोनारा हॉल या मार्गाने ही मिरवणूक गेली होती, या मिरवणुकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो लोक सामील झाले त्यामुळे वाहतूकिस अडथळा आणि सार्वजनिक रस्त्यांची वाहतूक बंद झाली होती, ड्रोनचा विनापरवाना वापर, घोषणाबाजी करणे, बेकायदेशीर जमाव,त्याचप्रमाणे ढोल ताशे वाजवून ध्वनी प्रदूषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राजा उल्हासनगरचा मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सिंग लबाना व अन्य पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.