राज्यात 'आयुष्मान भव' या आरोग्य विषयक उपक्रमास सुरूवात

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत "आयुष्मान भव" योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न

    13-Sep-2023
Total Views |

aayushman bhav


मुंबई :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशव्यापी 'आयुष्मान भव' या आरोग्य विषयक उपक्रमाचा आज दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला. या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून करण्यात आला. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

आरोग्य योजनांचा लाभ सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेले 'आयुष्मान भव' अभियान चांगले राबवून महाराष्ट्राला उपक्रमाच्या अंमलबजावणीत देशातील सर्वोत्कृष्ट राज्य बनवावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी बोलताना केले. राज्यात वरिष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. सन २०३१ पर्यंत वरिष्ठ नागरिकांची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या १५ टक्के इतकी असेल, असे सांगून शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये वरिष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र वॉर्ड (जेरियाट्रिक वॉर्ड) सुरु करावे, तसेच आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी खास वरिष्ठांची रुग्णवाहिका सेवा सुरु करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
 
अवयवदान व रक्तदान या कार्यक्रमात विद्यापीठांचा सहभाग वाढल्यास त्यातून मोठे उद्दिष्ट प्राप्त करता येईल. या दृष्टीने हा विषय आपण विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत होणाऱ्या बैठकीत घेऊ असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री सहायता योजनेतून आतापर्यंत ११२ कोटी रुपयांची मदत लोकांना केली असून राज्यातील सर्व जनतेला सरसकट पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 
 मुंबईत २५० ठिकाणी झोपडपट्टीच्या बाजूला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' सुरु करण्यात आले असून राज्यात ७०० ठिकाणी असे दवाखाने सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ४.९२ कोटी माताभगिनींची मोफत आरोग्य तपासणी तसेच २.४० बालक - बालिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या असून 'निरोगी आरोग्य तरुणाईचे' उपक्रमांतर्गत १८ वर्षांपासून तर वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आरोग्य परीक्षण केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी सांगितले.
 
 यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यासाठी चांगले कार्य करणाऱ्या 'मॅक्स हेल्थकेअर', नागपूर जिल्हा क्षयरोग अधिकारी, जालना जिल्हा क्षयरोग अधिकारी, धुळे शहर क्षयरोग अधिकारी व मुंबई शहर क्षयरोग अधिकारी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नर्सिंग होम नोंदणी, धर्मादाय रुग्णालय प्रवेश व समुदाय आरोग्य अधिकारी या 'अँप'चे उदघाटन करण्यात आले. यावेळी सर्वांनी 'अवयव दान' करण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले, आमदार मनीषा कायंदे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना, आरोग्य संचालक धीरज कुमार व इतर अधिकारी उपस्थित होते.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.