कोलकाता :फ्लॅट विक्रीत ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ यांची मंगळवार, दि. १२ सप्टेंबर रोजी 'ईडी'कडून चौकशी करण्यात आली. त्या सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाल्या. 'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेट कंपनी '७ सेन्सेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड' ने कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली ४०० लोकांकडून प्रत्येकी ५.५ लाख रुपये घेतले होते. मात्र, लोकांना फ्लॅट मिळाले नाहीत. तसेच, त्यांनी भरलेले पैसेही परत मिळाले नाहीत. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती.