मूर्त्या-स्तंभांसह रामजन्मभूमीत सापडले पुरातन मंदिरांचे अवशेष!

राम मंदिराच्या उद्घाटनात सहभागी होण्यासाठी दक्षिण कोरिया ही उत्सुक!

    13-Sep-2023
Total Views |
ram mandir

नवी दिल्ली
: अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. यावेळी मंदिराच्या बांधकामादरम्यान केलेल्या उत्खननात पुरातन अवशेष सापडले असून तेही सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. ह्या अवशेषांची छायाचित्र ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरही शेअर केले आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत म्हणाले की, भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केले तर त्यांचा देश या कार्यक्रमात नक्कीच सहभागी होईल.

दरम्यान, अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनासंदर्भात दक्षिण कोरियाचे राजदूत चांग जे-बोक यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जर भारत सरकारने बोलावले तर दक्षिण कोरिया या उत्सवात कोणतीही कसर सोडणार नाही, असे ते म्हणाले. पीटीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दक्षिण कोरियाचे राजदूत चांग जे-बोक म्हणाले, “अयोध्या भारत आणि दक्षिण कोरियासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकार किंवा यूपी सरकारने राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यावी. "जर भारत सरकारने अधिकृत निमंत्रण दिले तर दक्षिण कोरिया नक्कीच कार्यक्रमात सहभागी होईल."




राजदूत चांग जे-बोक म्हणाले की, अयोध्या दक्षिण कोरियासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. कोरियन पौराणिक कथांनुसार, अयुथया राज्यातील एक भारतीय राजकन्या तिच्या राजकुमाराशी लग्न करण्यासाठी कोरियाला गेली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरियामध्ये अयोध्येला 'आयुधा' म्हणतात आणि आमचे नाते २००० वर्षांपेक्षा जुने आहे. ते म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित केल्यास दक्षिण कोरिया मोठ्या प्रमाणावर तयारी करेल आणि सहभागी होईल.



तसं पाहायला गेलं तर, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी २०१८ मध्ये अयोध्येला आल्या होत्या. २०१८ मध्ये दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जंग-सूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट दिली होती. त्या वर्षी ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या होत्या आणि त्यांनी अयोध्येतील राणी सुरीरत्न (हुह ह्वांग-ओके) च्या नवीन स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाचे नेतृत्व केले. ही तीच राणी सुरीरत्न आहे जिचा कोरियाच्या राजाशी विवाह झाला होता. राजाशी लग्न केल्यानंतर तिला राणी हू ह्वांग-ओके म्हणून ओळखले जाऊ लागले.

दरम्यान जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी राममंदिराचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्येतील धार्मिक नगरीमध्ये रामललाच्या भव्य मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर प्राण-प्रतिष्ठा महोत्सवाची तयारीही जोरात सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देश-विदेशातून लाखो पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.